"१० लाखात तलाठी व्हा", विरोधी पक्षनेत्यांनी केला TCS आऊटसोर्सचा भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:01 PM2024-01-11T14:01:42+5:302024-01-11T14:02:29+5:30
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
मुंबई - राज्य सरकारने घेतलेली तलाठी भरती परीक्षा ही जाहिरात निघाल्यापासून वादात सापडली आहे. सुरुवातीला या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल १००० रुपये फी आकारणी घेण्यात आली होती. त्यानंतर, परीक्षेत झालेली पेपरफुटी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे उमेदवारांना वेळेत न पोहोचता आल्याची अडचण आणि आता परीक्षेच्या निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तलाठी परीक्षा निकालातील गुणांवरुन ही भरती आणखीणच वादात सापडली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. आता, त्यांनी टीसीएसच्या आऊट सोर्सचा भांडाफोड केलाय
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन या भरती प्रक्रियेत कशाप्रकारे घोटाळा झाला, याची माहिती दिली. तसेच, १० लाख रुपयांत तलाठी व्हा.. अशा पद्धतीने या भरतीसाठी लाच घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 11, 2024
असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व…
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभरात दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान ९ आरोपी समान आहेत, आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे, अशी बाब विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरुन सांगितली.
परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी ३ लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत, तरीही सरकार गंभीर नाही, असे म्हणत राज्य सरकारला विरोधी पक्षनेत्यांनी सवाल केला आहे. त्यामुळे, लाखो विद्यार्थ्यांनी भविष्याचं स्वप्न पाहून दिलेली परीक्षा वादात अडकली असून राज्य सरकार याबाबत गंभीर होणार का, उमेदवारांच्या भविष्याशी होत असलेला खेळ थांबवणार का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.