H3N2 इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहा, आरोग्यमंत्र्यांची सूचना; या जिल्ह्यात प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:52 PM2023-03-16T12:52:47+5:302023-03-16T12:55:53+5:30
राज्यात १३ मार्च अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई - राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्य स्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले. एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री सावंत यांनी विधानसभेत निवेदन केले.
मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात.
राज्यात १३ मार्च अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत. इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. या आजाराचे लक्षणे तसेच उपचार पध्दती या बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य सर्व प्रमुख अधिकारी यांची आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली व यावेळी सर्वांना सतर्क राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत तसेच काळजी घेण्यात येत आहे .
राज्यात उपाययोजना राबविण्यात येताहेत
- प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
-फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.
-फ्ल्यू सदृश रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार केले जात आहेत.
-राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसंच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
-सर्व खाजगी रुग्णालयांना देखील याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत
-औषधे आणि इतर साधनसामुग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.