टू बी आॅर नॉट टू बी...

By admin | Published: January 11, 2015 01:42 AM2015-01-11T01:42:16+5:302015-01-11T01:42:16+5:30

पक्षप्रमुखांच्या चित्रप्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पक्षप्रमुख सगळ्यांना फोटो दाखवत होते. ते दाखवताना आठवणी सांगत होते.

To be and not to be ... | टू बी आॅर नॉट टू बी...

टू बी आॅर नॉट टू बी...

Next

पक्षप्रमुखांच्या चित्रप्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पक्षप्रमुख सगळ्यांना फोटो दाखवत होते. ते दाखवताना आठवणी सांगत होते. त्या वेळी त्यांच्यात झालेली बोलणी दादासाहेबांच्या कानी पडली आणि त्यांनी ती थेट वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवून दिली... (कोणती वाक्ये कोणाची हे काही त्यांनी कळवलेले नाही! त्यामुळे वाचकांनी सोयीने वाचावीत)
पक्षप्रमुख आणि पृथ्वीराजबाबा
चांगले फोटो आहेत... स्वच्छ प्रतिमेचे वाटतात...
हो ना, अगदी तुमच्यासारखेच स्वच्छ आहेत... मात्र काहींच्या फ्रेम काळसर आहेत, काहींच्या ब्राऊन तर काहींच्या ग्रे देखील आहेत...
एवढे सारे रंग तुम्हाला एकत्र कसे काय जमतात हो... मी एकच एक स्वच्छ प्रतिमेचा रंग जपताना तीन वर्षे हैराण झालो होतो...
हे तर नवीनच सांगत आहात तुम्ही, आम्हाला तर तुमच्यामुळे बाकीचेच हैराण झाल्यासारखे दिसत होते... पण काही म्हणा, तुम्ही चांगल जमवलंत...
कसचं काय हो, तुमच्याकडे कसं तुमच्या चिरंजीवांना सगळे खूश ठेवतात तसचं आमच्याकडे राजपुत्रांना खूश ठेवलं मी... झालं...
काही म्हणा, आपल्या दोघांत एक तरी साम्य निघालचं... तरी मला तुमच्या प्रतिमेविषयी खूप कौतुक होतं बरंका...
(मधेच चिरंजीवांनी विचारलं, डॅड, प्रतिमा मोठी असते की प्रतिभा... आणि असं असेल तर आपल्यापेक्षा यापैकी एक जण जरी मोठा असेल तर आपल्याला त्याचा विचार करावा लागेल... तेवढ्यात चित्रं पाहण्यासाठी छगनराव आल्याने चर्चा तेथेच संपली...)
छगनराव आणि पक्षप्रमुख :
नेहमी मला मोठे साहेब म्हणायचे, अरे, तू पण असा एखादा छंद शिकून घे... पण मी कायम दुर्लक्ष केलं...
पण मी नाही केलं. त्यांचे सल्ले ऐकल्याचा फायदाच झाला मला. आज रिकाम्या वेळेत काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवता आलं ना मला...
(तोंडाचा चंबू करून) खरंय तुमचं... आम्ही दुर्दैवी ठरलो... मोठ्या साहेबांचा सल्ला मानला असता तर आज निदान आमच्याकडेच एखादी चांगली जबाबदारी निभावता आली असती... पण नाही... आम्ही देखील पुतण्याच्या प्रेमात पडलो आणि आज आम्हीच बनवलेल्या नाशिक - मुंबई रोडवर दिवस दिवस एकटेच फिरत बसलोय... नुसतेच जंगल दिसते आहे... दूरदूरवर बांधकाम करण्यासाठी जागाही दिसत नाही...
(मधेच चिरंजीव म्हणाले, डॅड, मोठे साहेब म्हणजे कोण? हे आपल्या साहेबांबद्दल बोलतायंत की बारामतीच्या काकांबद्दल... पण तेही आपल्याच साहेबांना मोठे साहेब म्हणायचे... यांना सांगून टाका हं कोण मोठे साहेब ते... नाहीतर... तेवढ्यात देवेंद्रजी आले आणि छगनराव रुद्राक्षाच्या माळा हाती घेतलेल्या एका फोटोच्या दिशेने वळाले...)
पक्षप्रमुख आणि देवेंद्र :
वा वा... जोरदार आहेत चित्रं... विशेषत: हे तोंडातून आग ओकणारे फोटो तर अफलातून... आमच्याकडे काही मोठे वजनदार लोक शब्दातूनच आग ओकत असतात...
दुसरं जमतं तरी काय तुमच्याकडच्या लोकांना... हल्ली तुम्ही पण मोठे वजनदार होऊ लागलात...
छे हो, आम्ही कसले मोठे वजनदार? खरे मोठे वजनदार वेगळेच... म्हणून तर आमच्याकडे अशांना गड करी म्हणतात...
(मधेच चिरंजीव म्हणाले, डॅड हे आता आणखी मोठे नेते कोण आले मध्येच... एकदाच सगळ्यांना सांगून टाका बरं... तेवढ्यात मिलिंदकाकाने चिरंजीवांना पिझ्झा खाण्यासाठी बाहेर नेले...)

अतुल कुलकर्णी

Web Title: To be and not to be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.