Join us

खबरदारी घ्या अन् सण साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:05 AM

- डॉ. स्‍मृती नस्‍वा सिंगहोळी हा रंगांचा सण. सद्य:स्थिती पाहता आपण सर्वांनी फक्‍त आपले जवळचे नातेवाईक व मित्रांसोबत ...

- डॉ. स्‍मृती नस्‍वा सिंग

होळी हा रंगांचा सण. सद्य:स्थिती पाहता आपण सर्वांनी फक्‍त आपले जवळचे नातेवाईक व मित्रांसोबत जबाबदारीने व काळजीपूर्वक होळी सण साजरा करण्‍याच्‍या योजना आखल्या असतील. मुंबईमध्‍ये कोविड-१९च्‍या वाढत्‍या संसर्गामुळे चिंता वाढत असताना होळीचे रंग आपले मन, मूड्समध्‍ये नवचैतन्‍य आणतील आणि आपल्‍याला उत्‍साहित करतील, अशी अपेक्षा आहे.

..........................

कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सामाजिक अंतर राखून आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखून आपण या घातक विषाणूचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. माझ्या मते, यंदा होळी खेळणे टाळलेले बरे किंवा घरामध्ये कुटुंबातील सदस्यांबरोबर होळी खेळावी. परंतु, तरीही बाहेर जाण्याची व खेळण्याची इच्छा असलेल्यांनी मोठ्या संख्येने गोळा होणे टाळणे, नेहमी मास्क वापरणे व सातत्याने सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे. यंदा होळीच्या रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका ओळखून विषाणूपासून आपल्‍या स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी सर्व आवश्‍यक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

पश्चात्तापापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा

कोरोनाचा वाढता संसर्ग हा धोकादायक असून सण-उत्सव साजरे करीत असताना आजूबाजूच्या व्यक्तींच्या निरोगी आयुष्याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने सामाजिक भान बाळगून सण-उत्सव घरात साजरे करण्यावर भर दिला पाहिजे. आजार झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केल्यास समाज सुदृढ राहण्यास मदत होईल.

होळी खेळण्‍यापूर्वीची तयारी

सणाच्‍या दिवशी त्‍वचेचे संरक्षण करणे हे पुरेसे नाही. ईष्‍ट परिणामांसाठी सणाच्‍या काही दिवस अगोदरपासूनच विशिष्ट खबरदारी घेता येऊ शकते.

१. त्‍वचेवर तेल किंवा पेट्रोलियम जेली किंवा कोल्‍ड क्रीमचा जाड थर लावा.

२. केस व दाढीलादेखील जास्त प्रमाणात तेल लावा.

३. दिवसा बाहेर जाण्‍याच्‍या ३० मिनिटे अगोदर अधिक प्रमाणात सनस्क्रीन लावावे आणि दीर्घकाळापर्यंत दिवसभर बाहेरच राहणार असाल तर दर तीन तासांनी सनस्क्रीन लावावे.

४. होळीच्‍या रंगांमुळे नखांवर निळे व हिरवे डाग दिसू शकतात, यापासून संरक्षणासाठी नेल पॉलिश चांगला उपाय आहे.

होळी खेळताना

१. सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करा, मास्‍क घालणे अनिवार्य आहे, अधिक प्रमाणात शारीरिक संपर्क टाळा.

२. सुक्‍या सेंद्रिय रंगांचा वापर करा.

३. सोनेरी व चंदेरी रंगांचा वापर टाळा.

४. दाह किंवा जळजळ जाणवल्यास रंग धुऊन टाका.

५. मॉइश्‍चरायझर जवळ असल्‍यास उपयुक्‍त. मॉइश्‍चरायझर्स ओल्‍या त्‍वचेवर उत्तम काम करतात, म्‍हणून त्‍वचा पाण्‍याने ओली करा आणि त्‍यावर मॉइश्‍चरायझर लावा. दाह होत असल्‍यास त्‍यावर बर्फ लावा किंवा पाण्‍याचे थेंब शिंपडा आणि त्‍यानंतर मॉइश्‍चरायझर लावा.

६. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने त्‍वचेला सखोल पोषण मिळते.

होळी खेळल्‍यानंतरची स्‍वच्‍छता

१. ओले व सुके कपडे वेगळे ठेवा.

२. गरम पाण्‍याने आंघोळ करा.

३. विशेषत: चेहऱ्यासाठी कोमट पाण्‍यासह शुद्ध दुधाचा वापर करा. हे सोल्‍युशन लेपनंतरच्‍या दुसऱ्या वॉशसाठीही वापरता येऊ शकते.

४. रंग काढण्‍यासाठी मीठ, ग्लिसरिन व अरोमा तेल हेदेखील उपयुक्‍त आहे.

५. रंग ओरखडून काढण्‍याचा प्रयत्‍न करू नका. विशेषत: चेहऱ्यावर पुरळ व खळगे असलेल्‍या व्‍यक्‍तींनी ओले असतानाच लेप काढून टाका.

६. टाळू स्‍वच्‍छ धुण्‍यासाठी केस शॅम्‍पूने धुणे आवश्‍यक आहे. कंडिशनर केसांना कंडिशन व मॉइश्‍चर करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि केसांचे झुलपे होणे रोखेल.

७. त्‍वचेसाठी आंघोळीनंतर मॉइश्‍चरायझरचा वापर आणि केसांसाठी सीरमचा वापर उपयुक्‍त आहे.

(लेखिका सौंदर्यविषयक सल्लागार आणि त्वचा तज्ज्ञ आहेत.)