काळजी घ्या! जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:58 AM2020-04-30T00:58:12+5:302020-04-30T00:58:18+5:30

धारावीसारख्या परिसरात तर प्रयत्नांती आता कुठे कोरोनाबाधितांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Be careful! Chance of a second wave of corona in July, August | काळजी घ्या! जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

काळजी घ्या! जुलै, ऑगस्टमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

Next

सचिन लुंगसे 
मुंबई : देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर केंद्रासह राज्याला नियंत्रण राखण्यात यश येत आहे. धारावीसारख्या परिसरात तर प्रयत्नांती आता कुठे कोरोनाबाधितांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्याचप्रमाणे भविष्यातही आपण कोरोनाला हद्दपार करू, असा विश्वास सर्वच स्तरातून व्यक्त होत असतानाच आता आणखी चिंंतेने वैज्ञानिकांना ग्रासले आहे. कारण मान्सून सुरू झाल्यानंतर जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना संक्रमणाची लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. बंगळूरु आणि मुंबईत करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता आहे.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत कोरोनाचा वेग कमी होईल. लॉकडाउन उठल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत निश्चितच घट होईल. मात्र हे मत व्यक्त करतानाच वैज्ञानिकांना आणखी एका चिंंतेने ग्रासले आहे. ती चिंंता म्हणजे मान्सून सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होईल. आणि जुलैसह आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमध्ये सूट दिली तरी ‘फिजिकल डिस्टन्स’ आपण कसा नियंत्रित करतो? यावर बरेच काही आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात आयआयएससी आणि टीआयएफआरच्या संशोधकांनी मांडलेल्या अभ्यासात आयसोलेशन, क्वारंटाइन, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाउनचे विश्लेषण करण्यात आले आहे. बंगळुरू आणि मुंबईत करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी आताच आणखी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मान्सूनदरम्यान देशभरात अनेक ठिकाणी साथीचे आजार वाढत असतात.
।मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती!
मान्सून सुरू झाला की मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान सुरू होते. सरकारी आणि खासगी रुग्णालयांसमोर रुग्णांच्या रांगा लागतात. साथीच्या आजारांना थोपविता थोपविता प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. परिणामी, आतापासून चाळी, झोपड्या आणि इमारतींच्या परिसरात अधिकाधिक स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना करण्याचे गरजेचे आहे. दुसरीकडे मुंबईकरांनीदेखील महापालिकेच्या आवाहनाची वाट पाहू नये; तर स्वत:हून याकामी महापालिकेला सहकार्य करावे, असे म्हणणे नगरसेवक स्तरावर मांडले जात आहे.
।महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परिसरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढतेय. यावर जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाउन ठेवणे हा एक उपाय आहे. पावसाळ्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होईल की नाही, हे नक्की सांगता येत नाही. मात्र या कालावधीत संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत दरवर्षी वाढ होते. मलेरिया, डेंग्यू रुग्णांमध्ये साधारणत: तापाची लक्षणे सारखी दिसतात. अशा वेळी हा ताप साधा आहे की कोविड-१९ संसर्गामुळे आला आहे हे सांगणे खूपच अवघड होईल. त्यामुळे, या संसर्गजन्य आजारावरसुद्धा सोशल डिस्टन्सिंग हा उत्तम पर्याय आहे. म्हणूनच नागरिकांनी घरातच राहावे; जेणेकरून अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांची लागण होण्यापासून स्वत:चा बचाव करता येऊ शकेल.
- डॉ. विक्रांत शहा, फिजिशियन आणि संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या प्रचंड वाढतोय. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता संपूर्ण देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. पावसाळ्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढेल का? हे सांगू शकत नाही. कारण, हवामानाचा आणि कोरोना व्हायरस विषाणूचा एकमेकांशी संबंध नाही. पण पावसाळ्यात होणाºया साथीच्या आजारांचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. याशिवाय कोरोना रुग्णांची संख्या जसजसी कमी होईल, ते पाहून सरकार लॉकडाउनबाबत योग्य तो निर्णय घेईल. परंतु, तोपर्यंत नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. कारण सध्या हा एकच पर्याय सर्वांसमोर आहे.
- डॉ. प्रीतम मून, वैद्यकीय तज्ज्ञ
।चाळी आणि झोपड्यांत घ्या खबरदारी!
मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. मुंबईची अधिकाधिक जनता चाळी आणि झोपड्यांमध्ये राहते.
कुलाबा येथील बधवार पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर बैठी वस्ती आहे.
गिरगावसारख्या मराठमोळ्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर बैठी वस्ती असून, येथे चाळी अधिक आहेत.
डोंगरीच्या पूर्वेकडील परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत.
रेतीबंदरसह शिवडीकडील परिसर झोपड्यांनी व्यापला आहे.
बीडीडी आणि बीआयटी चाळींनी मध्य मुंबईचा परिसर व्यापला आहे.
वडाळा येथील कोरबा मिठागरसह माहीम परिसरात झोपड्या आणि बैठ्या चाळी आहेत.
धारावीतील वस्त्या दाटीवाटीने वसल्या असून, येथील वस्तीला मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
कुर्ला येथे चाळींसह बैठ्या खोल्या असून, यातील बहुतांश वस्ती मिठी नदीच्या किनारी वसली आहे.
घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडचा बहुतांश परिसर हा डोंगर उतारावर वसला असून, यात झोपड्यांसह चाळींचा समावेश आहे.
जोगेश्वरी, कांदिवली आणि बोरीवली येथे मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळी आहेत.
मालाड मालवणी येथील परिसर झोपड्यांनी व्यापला आहे.
विमानतळालगत मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसल्या असून, यात कालिना, सांताकु्रझ, कुर्ला, विलेपार्ले, मरोळ परिसराचा समावेश आहे.
मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथेही मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत.

Web Title: Be careful! Chance of a second wave of corona in July, August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.