सावधान! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:08 AM2021-01-19T04:08:26+5:302021-01-19T04:08:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदाची मकरसंक्रांत सगळीकडेच अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. इंग्रजी नवीन वर्षातील पहिलाच सण समजल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाची मकरसंक्रांत सगळीकडेच अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. इंग्रजी नवीन वर्षातील पहिलाच सण समजल्या जाणाऱ्या मकरसंक्रांतीला मुंबईत अनेकांनी तीळगुळ वाटून, पतंग उडवून व शुभकार्याला सुरुवात करून आनंद व्यक्त केला. मात्र आता मकरसंक्रांत झाल्यानंतर महिला एकमेकींना वाण देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची लस आल्याने मुंबईतील नागरिकांच्या मनातून कोरोनाविषयीची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईतील सर्वच ठिकाणी पूर्वीप्रमाणेच गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मकरसंक्रांतीला वाण देण्यासाठी महिला एकमेकांच्या घरीदेखील जात आहेत. अशा वेळी चेहऱ्यावर मास्क एकमेकांमधील सुरक्षित अंतर याचा अनेक महिलांना विसर पडलेला दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरीदेखील मुंबईत दिवसाला सरासरी ६०० ते ७०० कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचप्रमाणे सरासरी १० ते १५ रुग्णांचा दिवसाला मृत्यू होत आहे. कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांना देण्यास अजून किती वेळ जाईल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही. मात्र नागरिक शासनाने घालून दिलेले नियम पाळत नसल्याने लसीकरणाच्या वेळीच कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबईत कोरोना पसरतोय
१४ जानेवारी - ६०७ पॉझिटिव्ह ९ मृत्यू
१५ जानेवारी - ५७४ पॉझिटिव्ह ८ मृत्यू
१६ जानेवारी - ५७१ पॉझिटिव्ह ८ मृत्यू
१७ जानेवारी - ५३१ पॉझिटिव्ह ७ मृत्यू
१८ जानेवारी - ३९५ पॉझिटिव्ह ७ मृत्यू
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.