मनीषा म्हात्रे
मुंबई : पोलंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पालघरमधील एका २७ वर्षीय तरुणाला इमिग्रेशनमध्ये चूकीची माहिती भरल्याची भिती घालून ठगाने ४६ हजार लाटले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सायबर भामटयांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत क्रमांकाचा वापर करून ही फसवणूक केली आहे. या भामट्याकड़े आता या फसवणूक झालेल्या तरुणाच्या पासपोर्टची डिटेल्स असल्याने या तरुणासह त्याचे कुटुंबिय चिंतेत आहेत. त्यामुळे या तरुणाने पोलंड पोलिसांसहमुंबई पोलीस, पालघर पोलीस आणि महाराष्ट्र सायबर विभागाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. पालघर परिसरात आई, वडील आणि आजीसोबत राहणाऱ्या अजयला (नावात बदल) स्कॉलरशिपमुळे पौलंडच्या नामांकित विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळाली. २०१७ पासून तो पोलंडमधील विद्यापीठात अल्मायजर या आजारावर संशोधन करत आहे. गेल्या वर्षीच्या जुलै, ऑगस्टमध्ये सुट्टी असल्याने तो घरी आला होता. त्यानंतर सप्टेबरमध्ये तो पोलंडला परतला. अजयने लोकमतला दिलेल्या माहितीत, २३ जुलै रोजी एका व्यक्तीने लँडलाईन क्रमांकावरून त्याला कॉल केला. या कॉल धारकाने परराष्ट्र मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगत, गेल्यावर्षी इमिग्रेशन अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्याने ४६ हजार रुपये दंड भरावे लागतील, अन्यथा कायदेशीर नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे अजयला सांगितले. अजयचा विश्वास बसावा म्हणून कॉल धारकाने त्याला कॉल केलेला हा परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत क्रमांक तपासण्यास सांगितला. संकेतस्थळावरचा क्रमांकही तोच होता. पुढे अजयचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्याच्या राहण्याच्या पत्त्यासह त्याच्या पासपोर्टचा तपशील सांगितला. अजय घाबरल्याचे लक्षात येताच दंडाची रक्कम पाठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकीलाचा मोबाइल क्रमांक दिला. संबंधित महिला वकीलाचा मोबाईल क्रमांकही सर्वोच्च न्यायालयाच्या यादीत असल्याने अजय आणखीनच घाबरला. कॉलधारकावर विश्वास ठेऊन त्याने पैसे पाठवले. मात्र अजयने याची पावती पाठविण्याचीही मागणी केली. सबंधित कथित अधिकाऱ्याने फोन संपेपर्यंत पावती मिळणार असल्याची बतावणी केली. मात्र बराच वेळ वाट बघूनही पावती न आल्याने अजयने पुन्हा त्या क्रमांकावर कॉल केला. यावेळी मात्र कॉल पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत कार्यालयात लागला. या कार्यालयाने आपल्याकडून अशाप्रकारे कुणालाही कॉल केला जात नसल्याचे स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे सांगितले. कॉलवर विश्वास ठेऊ नका याबाबतचे परिपत्रकही पोलंडच्या रहिवाशांसाठी जारी केल्याचे नमूद केले. अजयने या फसवणूकीबाबत वेस्टर्न युनियनकड़ेही चौकशी केली, तेव्हा हे पैसे उत्तर प्रदेशातील बिन्नौर येथून काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अजयने पोलंड पोलिसांसह पालघर पोलीस आणि महाराष्ट्र सायबर विभागाकडे तक्रार दिली आहे. तसेच वॉरसॉ येथील भारतीय दूतावासाकडेही तक्रार दिली आहे.
पासपोर्टचा गैरवापर होण्याची जास्त भिती...सध्या पैशांपेक्षा पासपोर्टचा गैरवापर होऊ नये याची जास्त भिती आहे. अनेकदा दहशतवादीही चुकीच्या गोष्टीसाठी वापर करतात याबाबत अनेकदा ऐकले. कुटुंबियही जास्त चिंतेत आहे. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे गरजेचे आहे. माझ्यासारख्या अनेक जण याचे शिकार ठरत आहे. तसेच आमच्यापर्यंत परराष्ट्र मंत्रालयाकड़ून याबाबत माहिती आली नाही. किमान त्यांनी सर्व विद्यापीठाना याबाबत माहिती देणे गरजेचे होते. तक्रारदार तरुण, पोलंड
परराष्ट्र मंत्रालय म्हणे अशा कॉलपासून सावधान...परराष्ट्र मंत्रालयाकड़े आलेल्या तक्रारीनुसार मार्च महिन्यापासून पोलंडमध्ये येणाऱ्यांना परदेशी नागरिकांना लक्ष्य करत, इंगिग्रेशन, व्हिसा तसेच स्वतःच्या बाबतीत अर्धवट, अथवा चुकीची माहिती दिल्याबाबतचे कॉल करण्यात येत आहे. यात, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत क्रमांकाचा वापर होत आहे. मात्र अशाप्रकारे कॉल आल्यास नागरिकांनी थेट जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. २२ मार्च रोजी त्यांनी याबाबत पोलंडमधील परदेशी नागरिकांना अशा कॉल पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.