Join us

सावध राहा; व्हॅलेंटाईन डेला फ्री गिफ्ट पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:35 AM

व्हॅलेंटाईन डे निमित्त फ्री गिफ्टचे संदेश, पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र, याच मोफत गिफ्टच्या आमिषाला बळी पडून खिसा रिकामा होऊ शकतो.

मुंबई : व्हॅलेंटाईन डे निमित्त फ्री गिफ्टचे संदेश, पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र, याच मोफत गिफ्टच्या आमिषाला बळी पडून खिसा रिकामा होऊ शकतो. त्यामुळेच सावध राहा, अशा फ्री गिफ्टच्या जाळ्यात अडकून अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ती डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील गाेपनीय माहिती भामटे मिळवितात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असे सायबर पोलिसांनी सांगितले.

नुकताच ताज हॉटेलच्या नावाने सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोफत बक्षीस देण्यात येणार असल्याचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही बाब ताज हॉटेलच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून अशा प्रकारे कुठलेच गिफ्ट देण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले.

 

कोरोना लसीकरणाच्या नावाने फसवणूक

यापूर्वी कोरोना लसीकरणाच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. याबाबतही सायबर पोलिसांकड़ून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेमुंबई