Join us

सावधान! कोरोनाबाधितांचा आलेख वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:18 AM

राज्यात दिवसभरात १५५ मृत्यू : ५ हजार ६४० नवीन बाधितांचे निदानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांचा उतरता आलेख ...

राज्यात दिवसभरात १५५ मृत्यू : ५ हजार ६४० नवीन बाधितांचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधितांचा उतरता आलेख दोन दिवसांपासून वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अगदी सहा दिवसांपूर्वी अडीच हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दिवसाकाठी तीन हजारांच्या आसपास घुटमळणारा हा आकडा आता सहा हजारांच्या दिशेने सरकू लागला आहे. शुक्रवारी दिवसभरात ५ हजार ६४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील बारा दिवसांतील ही उच्चांकी संख्या आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सजग राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,६८,६९५ झाली आहे. तर, दिवसभरात १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ४६ हजार ५११ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के एवढा आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी ६ हजार ९४५ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या १६ लाख ४२ हजार ९१६ झाली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.

राज्याने एक कोटी चाचण्यांचा टप्पाही ओलांडला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

कोरोनाची मागील बारा दिवसांतील आकडेवारी

कोरोनाची मागील बारा दिवसांतील आकडेवारी

२० नोव्हेंबर - ५,६४०

१९ नोव्हेंबर - ५,५३५

१८ नोव्हेंबर - ५,०११

१७ नोव्हेंबर - २,८४०

१६ नोव्हेंबर - २,५३५

१५ नोव्हेंबर - २,५४४

१४ नोव्हेंबर - ४,२३७

१३ नोव्हेंबर - ४,१३२

१२ नोव्हेंबर - ४,४१६

११ नोव्हेंबर - ४,९०७

१० नोव्हेंबर - ३,७९१

९ नोव्हेंबर - ३,२७७

*राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

राज्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत १ कोटी ३५ हजार ६६५ चाचण्या झाल्या. यापैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.