डबल जॉब करून दोन्हीकडे हात मारत असाल तर खबरदार; ११०० जणांना आयकरच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:07 AM2023-08-09T09:07:25+5:302023-08-09T09:08:05+5:30

मूनलायटिंग करणाऱ्यांनी उत्पन्न लपवल्याचा ठपका. १०० लोकांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक मुंबईतील असल्याचे समजते.

Be careful if you are hitting both hands by doing double job; Income tax notices to 1100 people | डबल जॉब करून दोन्हीकडे हात मारत असाल तर खबरदार; ११०० जणांना आयकरच्या नोटिसा

डबल जॉब करून दोन्हीकडे हात मारत असाल तर खबरदार; ११०० जणांना आयकरच्या नोटिसा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या नोकरीसोबत अन्य काही कामे करत अतिरिक्त पैसे मिळवणारे, मात्र ते उत्पन्न आयकर विवरणामध्ये न दाखविणारे लोक आता आयकर विभागाच्या रडारवर आले असून, विभागाने अशा ११०० लोकांना नोटिसा जारी केल्या आहेत. 

एखादी व्यक्ती जे काही पैसे मिळवते त्या पैशांची माहिती संबंधित व्यक्तीने आपल्या वार्षिक आयकर विवरणामध्ये देणे बंधनकारक आहे. नोकरदार वर्गाला त्यांच्या कंपनीतर्फे फॉर्म- १६ दिला जातो, त्यातही ‘इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस’, असा रकाना असतो. जर कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीला आपल्या अतिरिक्त उत्पन्नाची माहिती दिली तर त्या रकान्यात ती भरून विवरण भरता येते. मात्र, आपल्या अतिरिक्त उत्पन्नाची माहिती आपल्या कंपनीला देण्याचे अनेक लोक टाळतात. कंपनीला अतिरिक्त उत्पन्नाची माहिती दिली नाही तरी विवरण भरतेवेळी हे उत्पन्न दाखवत त्यावर अनुषंगिक करभरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, हे अतिरिक्त उत्पन्न अनेकांनी लपवल्यामुळेच आयकर विभागाने आता या नोटिसा जारी केल्या आहेत. 

ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे, अशा लोकांना या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. या ११०० लोकांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक मुंबईतील असल्याचे समजते. बहुतांश लोकांना आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२०२१ याकरिता नोटिसा पाठविल्या आहेत. तर, लवकरच २०२१-२०२२ या वर्षासाठीची पडताळणी होणार असून, त्यात काही अतिरिक्त उत्पन्न लपविल्याची प्रकरणे आढळल्यास त्यांनाही नोटिसा जारी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

मूनलायटिंग म्हणजे काय?
आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करत मुख्य नोकरीसोबत अन्य ठिकाणी काम करून पैसे मिळवणे याला ‘मूनलायटिंग’ असे म्हणतात. लॉकडाउनच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, अकाउंटस् आदी क्षेत्रांत हा प्रकार वाढीस लागला होता आणि तेव्हाच हा शब्द अस्तित्वात आला आहे.

आयकर विभागाला कसे समजले?
 ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे, डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार करणे, क्रेडिट कार्डाचे पैसे ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरणे, अशा सर्व व्यवहारांची माहिती आयकर विभागाला एका क्लिकच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
 एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न आणि त्याने केलेला खर्च यांचा जर मेळ बसत असेल तर अशी व्यक्ती विभागाच्या रडारवर येत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्न व खर्चात तफावत आढळली तर मात्र निश्चित अशा व्यक्तीला नोटीस जारी करत विचारणा केली जाते.
 एक व्यक्ती जर दोन ठिकाणी काम करत असेल तर दोन्ही ठिकाणी तिचा टीडीएस कापला जातो. टीडीएस अर्थात आपला कर कापला गेला आहे तर विवरणामध्ये उत्पन्न का दाखवायचे, असा विचार करून अनेक जण ते लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर टीडीएस कापला गेला असेल आणि ते उत्पन्न विवरणात दिसले नाही तरी देखील अशा व्यक्तीला नोटीस जारी होऊ शकते. 

Web Title: Be careful if you are hitting both hands by doing double job; Income tax notices to 1100 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.