सावधान! ‘तो’ व्हिडीओ कॉल तुम्हालाही आला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 01:39 PM2021-12-18T13:39:36+5:302021-12-18T13:40:52+5:30

सेक्सटॉर्शनचे वाढते जाळे; उच्चशिक्षित, राजकीय मंडळी टार्गेट

Be careful if you get that such kind of video calls politicians highly educated on target | सावधान! ‘तो’ व्हिडीओ कॉल तुम्हालाही आला आहे का?

सावधान! ‘तो’ व्हिडीओ कॉल तुम्हालाही आला आहे का?

Next

मनीषा म्हात्रे

मुंबई :  सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडिओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच याच व्हिडिओच्या आधारे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीकडून उच्च शिक्षिताबरोबर राजकीय मंडळींनाही टार्गेट केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या १० महिन्यांत मुंबईत ३७ जण सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. 

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सायबर फसवणुकीचे २ हजार ३६९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात सेक्स टॉर्शनचे ३७ गुन्हे नोंद असून, २१ गुह्यांची उकल करण्यात आली. आतापर्यंत २९ जणांवर अटकेची कारवाई केली आहे. शिवसेनेचे दोन आमदार या जाळ्यात अडकले होते. पहिल्या घटनेत बदनामीच्या भीतीने आमदाराने पैसेही दिले. नंतर पोलिसांकडे तक्रार दिली, तर दुसऱ्या घटनेत आमदाराने वेळीच सतर्क होत तक्रार दिली.

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या टोळ्या
राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतले जाते.  त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळतात. 

असे रचतात जाळे

  • सोशल मीडियावर सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करतात. पुढे तुम्हाला चॅट व व्हिडिओ कॉल करण्यासाठी आग्रह करतात. तुम्हालाही आक्षेपार्ह स्थितीत येण्यास आग्रह केला जातो.  याचे रेकॉर्डिंग करीत पैशांची मागणी होते किंवा, पुढे ऑडिओ किंवा व्हिडिओ समस्या असल्याचे सांगत  तुम्हाला ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जातात. 
  • याच माहितीच्या आधारे तुमच्या मोबाइलमधील माहितीही चोरली जाते. या माहितीच्या बदल्यातही मंडळी पैसे उकळत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
     

अशी घ्या काळजी... : सर्व सोशल मीडिया अकाउंटस्ची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. तो क्रमांक लगेच ब्लॉक करा. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करीत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा.  
डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई 

यापूर्वीच्या घटना :
आधी  डेटिंग ॲपवर मैत्री; नंतर अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे खंडणीची मागणी नोव्हेंबर -डेटिंग ॲपवरून  ओळख झालेल्या एका मुलीने तरुणाला अश्लील व्हिडिओ कॉल करीत तरुणालाही नग्नावस्थेत व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगितले. पुढे हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली तरुणाचे खाते रिकामे केल्याचा प्रकार गावदेवी परिसरात समोर आला आहे. गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास करीत आहेत. 

  • मुंबईतील शिवसेना आमदारांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश राजस्थानमधील आरोपी मौसमदीन खान याने महिला बनून पाठविला होता.  
  • गप्पांमध्ये या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. 
  • पुढे याच व्हिडिओद्वारे आमदारांना ब्लॅकमेल करून ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी बदनामीच्या भीतीने सुरुवातीला ५ हजार रुपये फोन-पेद्वारे पाठविले. पुढे, आणखी पैशांची मागणी होताच, त्यांनी कुर्ला पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

Web Title: Be careful if you get that such kind of video calls politicians highly educated on target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.