Join us

गटारांवरील झाकणे चोरल्यास खबरदार, आता अलार्म वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:54 AM

महापालिकेतर्फे २४ विभागांसाठी मदत क्रमांक जाहीर

मुंबई : भूमिगत गटारांच्या प्रवेशद्वारांवरील (मॅनहोल्स) झाकणांची चोरी रोखण्यासाठी मुंबई पालिकेने आता २४ विभागांसाठी मदत क्रमांक जाहीर केले आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती गटारावरील झाकण उघडताना दिसल्यास वा झाकणाची खरेदी- विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास तक्रार करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. झाकणे चोरणाऱ्यांवर आणि ती खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. याशिवाय शहरात १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल स्मार्ट डिव्हाइस मॅनहोलवर बसविण्यात येणार असून, डी वॉर्डातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाणी तुंबणाऱ्या मॅनहोलवर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत साधारण एक लाख मॅनहोल आहेत. त्यापैकी पर्जन्य जलवाहिन्या खाते आणि मलनिस्सारण प्रचालन खाते यांच्याशी संबंधित गटारांची मॅनहोल खूप खोलवर असतात. खबरदारी म्हणून पालिकेने गटारांच्या प्रवेशद्वारांच्या आत संरक्षक जाळ्या बसविण्यास सुरुवात केली तसेच पावसाळ्यात सर्वेक्षण करून गटारांची प्रवेशद्वारांवरील तुटलेली झाकणेही बदलण्यात येत आहेत. मात्र, तरीही दरवर्षी गटारांवरील झाकणे गायब होतात. झाकणे चोरीला जाण्याच्या घटना सर्रास घडत असल्याने भूमिगत गटारांच्या झाकणाशी संबंधित तक्रारीसाठी नागरिकांनी पालिकेच्या जवळच्या चौकी किंवा विभागीय कार्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष (१९१६) या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भंगारवाल्यांवर करडी नजर मुंबईतील सर्व भंगार खरेदी करणाऱ्यांना पालिकेकडून सूचना देण्यात आल्या असून कोणीही मलवाहिनीवरील किंवा पर्जन्य-जलनिस्सारण वाहिनींवरील चोरीला, गहाळ झालेली डी.आय. किंवा सी.आय. बनावटीची झाकणे खरेदी करू नये. या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या सर्व संबंधितांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

डी वाॅर्डात प्रायोगिक तत्त्वावर डिव्हाइस

मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार फटकारल्यानंतर मुंबई महापालिकेने उघड्या मॅनहोलचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मॅनहोलचे झाकण उघडल्यास अलार्म वाजणार असून, प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या डी वॉर्डात डिव्हाइस बसविण्यात आले आहेत.

झाकणे उघडताच अलार्म वाजणार असून, बाबुला टँक येथील नियंत्रण कक्षाला मेसेज जाईल. हे डिजिटल स्मार्ट मॅन हे तंत्रज्ञान मॅनहोलच्या खाली एक फुटावर बसविण्यात येणार असून याची बॅटरी एक वर्षे चालेल. तसेच मुंबई शहरात १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल स्मार्ट डिव्हाइस मॅनहोलवर बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका