सावधान! म्युकोरमायकोसिसचा धोका वाढतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:03+5:302021-05-10T04:06:03+5:30
काेराेनामुक्त झालेल्यांना लागण; आतापर्यंत आढळले २००हून अधिक रुग्ण, आठ जणांनी गमावला जीव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील ...
काेराेनामुक्त झालेल्यांना लागण; आतापर्यंत आढळले २००हून अधिक रुग्ण, आठ जणांनी गमावला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने दिलासाजनक स्थिती आहे, मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने वैद्यकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या २०० वर गेली असून यामुळे आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, म्युकोरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत आहे. याला ब्लॅक फंगस असेही म्हणतात. राज्यात जे कोविड रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्यात ऑक्सिजनमुळे आर्द्रता निर्माण होते, परिणामी या रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता अधिक असते. काेराेनामुक्त मधुमेहींना याचा धाेका अधिक असताे. म्युकोरमायकोसिस आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे; मात्र कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीमुळे याची लागण हाेत आहे. स्टेराॅईडच्या वापरामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, परिणामी औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा स्थितीत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला की, रुग्णाची स्थिती अत्यवस्थ होण्याचा धोका असतो.
* पहिल्या लाटेतही रुग्ण, मात्र प्रमाण कमी
गेल्या दोन आठवड्यांपासून केईएम रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजार झालेले रुग्ण येत आहेत. दर दिवसाला २-३ रुग्ण येतात, यात बरेचसे रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. त्यांना उपचारांचा खर्च परवडत नाही, त्यामुळे पालिका रुग्णालयात येतात; मात्र रुग्णालयात येईपर्यंत या रुग्णांचा आजार गंभीर झालेला असतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही म्युकोरमायकोसिस या आजाराचे रुग्ण होते, परंतु त्या वेळेस हा संसर्ग कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन आठवड्यांनी दिसून येत होता. पण आता कोरोनावरील उपचार सुरू असतानाच या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. हेतल मारफातिया,
कान-नाक-घसातज्ज्ञ
* म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?
हे एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिस असेही म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस, रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही म्युकोरमायकोसिसची लक्षणे आहेत. हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत म्युकोरमायकोसिस आजार हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
* वेगवेगळ्या अवयवांचे हाेते नुकसान
म्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. फुफ्फुस आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते.
....................................