Join us

सावधान ! आयपीएल सुरू आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:09 AM

-संदीप चव्हाणसमाजातील एक घटक म्हणतोय की कोरोना, लॉकडाऊनच्या या काळात आयपीएल बंद करा. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टळेल आणि ...

-संदीप चव्हाण

समाजातील एक घटक म्हणतोय की कोरोना, लॉकडाऊनच्या या काळात आयपीएल बंद करा. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टळेल आणि व्यवस्थेवरील ताण कमी होईल, तर दुसरा घटक म्हणतोय आयपीएल सुरू ठेवा. त्यामुळे कडकडीत लॉकडाऊनला मदत मिळतेय. लोक घरातच थांबताहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नैराश्येच्या या वातावरणात तेवढीच एक मनाला उभारी आणि विरंगुळा.

आयपीएलमुळे कोरोनाचा फैलाव होतोय का? तर सद्य:स्थितीत त्याची तशी आकडेवारी उपलब्ध नाही. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या वतीने सहभागी टीमच्या खेळाडूंसाठी बायो बबलची काटेकोर अंमलबजावणी केली जातेय. सव्वाशे कोटींच्या भारतात या आयपीएलमध्ये सहभागी आठ टीममधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची एकूण संख्या सहाशेच्या वर नाही. त्यात मुंबईसहित चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, नवी दिल्ली आणि कोलकोता, अशा सहा सेंटरवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. या सहा केंद्रांपैकी कुठेही शंभर टक्के लॉकडाऊन नाहीय. अगदी महाराष्ट्र आणि दिल्ली जेथे सगळ्यात जास्त कहर आहे, तेथेही दुकाने आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी सकाळी ७ ते ११, अशी वेळ देण्यात आली आहे. हॉटेलमधील आयपीएलच्या खेळाडूंच्या विलगीकरणाचे नियमही काटेकोर आहेत. मैदानापासून ते हॉटेलपर्यंत खेळाडूंच्या बायो बबलमध्ये ढिसाळपणा असल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. असे असताना क्रिकेट नकोच, अशी भूमिका मांडणे कितपत योग्य आहे. सहाशे माणसांचे आयपीएल बंद केल्याने कोरोना रोखण्याला कितीसा फायदा होणार आहे?

आयपीएल समर्थकांचे म्हणणे आहे की, क्रिकेट हा भारताचा श्वास आहे. आयपीएलमुळे सव्वाशे कोटींच्या भारतात अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनला मदतच होतेय. लोक घरात थांबताहेत. गर्दी टळतेय. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या बातम्यांमधून येणाऱ्या नैराश्यावर आयपीएलचा विरंगुळा हाच उतारा आहे. ही झाली समाजभावना. काही अर्थतज्ज्ञांच्या मते आयपीएल रद्द केल्यास सुमारे तीन हजार कोटींचे नुकसान बीसीसीआय, आयपीएल फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर यांना सोसावे लागू शकते. उपलब्ध आकडेवाडीनुसार २०१५ च्या जीडीपीमध्ये आयपीएलने १,१५० कोटी रुपयांचे योगदान दिले होते. थोडक्यात क्रिकेट केवळ मनोरंजन नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे उभारी मिळतेय. लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत, तर अर्थव्यवस्थेसाठी आपण दारूची दुकानेही सुरू ठेवली होतीच ना!

कोरोनाचा कहर केवळ भारतातच नाही, तर जगभरात कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि पुरेशी खबरदारी घेतली, तर कोरोना टाळता येऊ शकतो, हे आपण अनुभवतोय. जगभरात मग युरोपियन फुटबॉल असो किंवा टेनिस स्पर्धा, या काटेकोर नियमांची अंमलबजावणी करून आजही सुरू आहेत. अगदी ज्यावेळी लसही उपलब्ध नव्हती, तेव्हा यूएईत गेल्या वर्षीची आयपीएल यशस्वीपणे खेळवण्यात आली होती. आयपीएलनंतर यूएईत कोरोना वाढीस लागल्याची आकडेवारी नाही. थोडक्यात, जर नियम पाळले, तर कोरोना टाळता येऊ शकतो; पण भारतासारख्या देशात अशी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करता येऊ शकते का? नेमकी गोची येथेच आहे. आयपीएलच्या थेट प्रक्षेपणादरम्यान विविध फ्रँचायजींच्या टीममध्ये १८ वर्षांखालील मुलेसुद्धा स्टेडियममध्ये दिसतायत. ती सपोर्ट स्टाफ कशी होऊ शकतात. परवाच वानखेडेवर मॅच सुरू असताना ती पाहण्याचा खटाटोप करणाऱ्या सचिन पाटील आणि विकी नाईक या दोघा क्रिकेट शौकिनांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मग हाच न्याय सगळ्यांना असला पाहिजे. नियम काटेकोरपणे न पाळणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवावाच लागेल. नाहीतर हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळाचा संदेश अवघ्या भारताला देणाऱ्या अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांनाही अखेर कोरोनाने गाठलेच ना! थोडक्यात चुकीला माफी नाही, हेच कोरानाने दाखवून दिले आहे.

आयपीलमधील फायद्या- तोट्याचा हिशेब ज्यांच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यांना तुम्ही कसे समजावणार? त्यामुळे आयपीएलमुळे फायदा होतोय की तोटा, यापेक्षा मला वाटतेय याचा सदुपयोग समाजाला जागरूक ठेवण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार आपण केला पाहिजे. आयपीएलमुळे जर लोक घरात थांबणार असतील, तर दरदिवशी किंवा एक दिवसाआड एक मॅचऐवजी दोन मॅच खेळवता येतील का, यावर विचार झाला पाहिजे. बीसीसीआयनेही सहभागी खेळाडूंचे सामाजिक संदेश लाइव्ह टीव्हीदरम्यान जास्तीत जास्त प्रसारित केले पाहिजे. अडीच मिनिटांच्या ब्रेकमध्ये स्थानिक कोरोना वॉरिअरचे कौतुक करणारे प्रेरणादायी व्हिडिओ प्रसारित करणे ब्रॉडकास्टरना बंधनकारक केले गेले पाहिजे. माध्यमांचा प्रभावी उपयोग यासाठी करता येऊ शकतो आणि हो पॅट कमिन्ससारका विदेशी खेळाडू जर गुदमरलेल्या भारतासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याकरिता ५० हजार डॉलरची मदत करू शकतो, तर बीसीसीआय ही मदतीसाठी आपल्या नफ्याला थोडी अतिरिक्त कात्री नक्कीच लावू शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवांचे नाव जय शहा आहे! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे ते पुत्र. जर जय शहा ऐवजी इतर कुणी बीसीसीआयच्या सचिवपदी असते, तर आयपीएल सुरू राहिले असते का? या प्रश्नाचे उत्तर या देशाचे सुप्रीम कोर्टही देऊ शकत नाही. कारण जर लाखोंची गर्दी असणाऱ्या निवडणुका, शेतकऱ्यांचा दिल्लीमधील लाँगमार्च, कुंभमेळा, रमजान, नांदेडमधील शिखांचा सोहळा होऊ शकतो, तर त्यापुढे आयपीएल अगदीच शुल्लक ठरते आणि म्हणूनच ‘शांतता कोर्ट सुरू आहे’च्या थाटात आपण एवढेच म्हणू शकतो... सावधान! आयपीएल सुरू आहे...