मुंबई - महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिक आणि पर्यटकांसाठी सूचना जारी केली आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरताना काळजी घेण्याचे आवाहनही विभाकडून करण्यात आली आहे. कारण, पुढील 6 दिवस समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह, नरिमन पाईंट, जुहू बीच, गिरगाव चौपाटी यांसह समुद्रकिनारी फिरताना सावधानतेचा इशारा दिला आहे.
आजपासून म्हणजेच शनिवारी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर 4.53 मिटर उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या आहेत. पुढील 5 दिवस आणखी समुद्राचा हाच अवतार पाहायला मिळणार आहे. शनिवार ते गुरुवार या सहा दिवसांत सागराला उधाण येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना पावसासह समुद्राच्या लाटांची मजा घेता येईल. पण, समुद्राच्या लाटांना आपल्या डोळ्यांमध्ये साठवताना सतर्क राहण्याचेही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. तसेच तात्काळ मदतीसाठी सुरक्षा रक्षकांना फोन करण्याचेही महापालिकेने सांगितले आहे. त्यासाठी 1916 आणि 101 या टोल फ्री नंबरवर संपर्क करता येईल. तसेच आज आणि उद्या पावसाची शक्यता असून कुलाबा, सांताक्रुझ याठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.