कोठडीत मृत्यू होणार नाही याची काळजी घ्या
By admin | Published: June 14, 2014 02:26 AM2014-06-14T02:26:28+5:302014-06-14T02:26:28+5:30
मुंबई पोलिसांच्या कोठडीत आरोपींच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेत उच्च न्यायालयाने पोलिसांचे चांगलेच कान उपटले आहेत़
मुंबई : मुंबई पोलिसांच्या कोठडीत आरोपींच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेत उच्च न्यायालयाने पोलिसांचे चांगलेच कान उपटले आहेत़ चौकशी करताना जरा सबुरीने घ्या़ संशयिताचा अथवा आरोपीचा मृत्यू होणार नाही याची काळजी घ्या़ कारण चौकशीचे अधिकार असले तरी कोणाचा बळी जाणार नाही याचेही भान पोलिसांनी ठेवायला हवे, असे खडेबोलही न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद यांच्या खंडपीठाने पोलिसांना सुनावले़
वडाळा प्रकरणात तेथील रेल्वे पोलिसांनी एप्रिल महिन्यात सोनसाखळी व अंगठी चोरीच्या आरोपाखाली अँग्लो वल्डरीस, सुफीया मोहम्मद, मोहम्मद इरफान व अरबाझ खान यांना अटक केली़ त्या वेळी अँग्लोचा मृत्यू झाला़ मात्र अँग्लो कोठडीतून पळून जात असताना रेल्वेखाली सापडला व त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांना केला़
दरम्यान, अँग्लोला पोलिसांनी मारहाण केली व त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा दावा करीत अँग्लोच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून सीबीआयमार्फत याची चौकशी करावी व नुकसानभरपाई म्हणून १ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली़
तसेच उर्वरित तीन संशयित आरोपींचा कोठडीत लैंगिक छळ करण्यात आला असून, याची नुकसानभरपाई म्हणून या तिघांना प्रत्येकी ५० लाखांची नुकसानभरपाई द्यावी, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे़
याची दखल घेत न्यायालयाने दोषी पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले़ त्यानुसार वडाळा रेल्वे पोलिसांतील एका पोलीस निरीक्षकासह सात जणांवर गुन्हा नोंदवला असल्याचे राज्य शासनाने शुक्रवारी पोलिसांना सांगितले़ या सर्व पोलिसांची येथून बदली करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)