Join us

वजन वाढणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी ऑफिसेस बंद असल्याने अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घराबाहेर न पडल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी ऑफिसेस बंद असल्याने अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घराबाहेर न पडल्यामुळे आणि तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्याने बहुतेक लोकांना वजनवाढीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याचा परिणाम पुन्हा वजनवाढीवर होऊ शकतो. म्हणून वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या की, वर्क फ्रॉम होममुळे काम करणे सोपे झाले असले तरी यामुळे अनेक दृष्परिणामांनाही सामोरे जावे लागत आहे. अनियमित वेळापत्रक, वाढीव ताण, त्रास, झोपेच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहाराचे सेवन न करणे ही वजन वाढीची मुख्य कारणे आहेत. घरी राहून शारीरिक हालचाल मंदावल्याने वजन वाढतेय. या वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. जसे की, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप एपनिया, कोलेस्टेरॉल संबंधी समस्या इत्यादीसारख्या लठ्ठपणाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत.

छातीरोगतज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी नियमित हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय विषाणूचा प्रसार वाढत असल्याने कौटुंबिक सोहळे टाळावे. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळावे, यासाठी पहाटे सूर्य प्रकाश घ्या. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा. पौष्टिक आहाराचे सेवन करा.

----------------

काय करावे

- तळलेले अन्न, जंकफूड, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे.

- जेवणात कोशिंबीर आणि सूप समाविष्ट करा.

- ताजी फळे किंवा बिया खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

- खाण्याचे वेळापत्रक ठरव.

- जंकफुड टाळा.

- चिप्स किंवा पेस्ट्री खाऊ नका.

- भरपूर पाणी प्या.

- साखरयुक्त पेय, कार्बोनेटेड पेये आणि फळांचा रस टाळा. कारण फळांच्या रसात जास्त प्रमाणात साखर मिसळून दिलेली असते.

- अल्कोहोल आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळावेत.

- दररोज व्यायाम करा.

- पुरेशी झोप घ्या.