लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होत आहे, त्यामुळे पक्ष्यांमध्ये होणारा हा आजार असला, तरी तो माणसांनाही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजित रानडे यांनी केले आहे.
बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये होणारा आजार आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरतो. हा विषाणू पक्ष्यांसाठी घातक आहे. माणसांनाही त्याची लागण होऊ शकते, पण माणसांना या रोगाची लागण होणे अत्यंत दुर्मीळ आहे, पण काळजी घेतली पाहिजे, असे रानडे यांनी सांगितले. ‘बर्ड फ्लू इन्फ्लूएजा’ असे याचे नाव असून, हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे न शिजविलेले मांस, तसेच अन्य कोणतेही पोल्ट्री उत्पादन कच्च्या स्वरूपामध्ये खाऊ नये. मांस शिजविण्यासाठी वेगळी भांडी वापरावी, बर्ड फ्लूच्या संसर्गामध्ये मासांहार करणे टाळावे, हात कोमट पाणी व साबणाने स्वच्छ धुवावे. कच्ची अंडी खाऊ नयेत, अर्धेकच्चे मांसही सेवन करू नये. मांसाहार करायचा असेल, तर ते पूर्णपणे शिजवावे, कच्च्या स्वरूपातील ‘रेडी टू इट’ पदार्थांचे सेवन टाळावे, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने ५ डिसेंबर रोजी दिले आहे. ते संबंधित राज्यांना द्यावेत, अशी मागणी ड्रग अँड फूड लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचे प्रमुख अभय पांडे यांनी संबंधित यंत्रणाकडे केली आहे.
परिणामी, लोकांनी या आजाराला घाबरून न जाता खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे मत डॉ.सागर कानविंदे यांनी व्यक्त केले. चिकन-अंडी खाण्यास हरकत नाही, पण ७० डिग्री तापमानावर ते शिजवून खावे, असे त्यांनी सांगितले. २००६ साली पहिल्यांदा आपल्या देशात हा रोग आला असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.