Join us  

पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्या - आयुक्त

By admin | Published: May 25, 2016 2:51 AM

येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने आता पावसाळापूर्व कामांवर जोर दिला आहे. विशेषत: ज्या भागात पावसाचे

मुंबई : येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने आता पावसाळापूर्व कामांवर जोर दिला आहे. विशेषत: ज्या भागात पावसाचे पाणी साचते; अशा ठिकाणांची आयुक्त अजय मेहता पाहणी करत आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या पाहणीवेळी येत्या पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.हाजी अली, लव्ह ग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर येथील पर्जन्य जल उंदचन केंद्रांसह रे रोड स्टेशनजवळील प्रस्तावित ब्रिटानिया पर्जन्य जल उंदचन केंद्राची अजय मेहता यांनी मंगळवारी पाहणी केली. या सर्व ठिकाणी तेथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर व पूर्वतयारीविषयक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी सर्व पर्जन्य जल उदंचन केंद्रांमध्ये डिझेलचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास समस्येचे तत्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने सर्व ठिकाणांसाठी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारीदेखील गरजेनुसार पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर असावेत, असेही आदेश आयुक्तांनी दिले. मंगळवारच्या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्तांनी पावसाळ्याच्या दिवसात नेहमी पाणी भरण्याच्या ठिकाणांचादेखील दौरा केला. यामध्ये हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय या परिसरांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी असणारे पंप हे पूर्ण क्षमतेने चालू असावेत व त्या पंपांची चाचणी नियमितपणे घ्यावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)पर्जन्य जल उदंचनाच्या अनुषंगाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या शक्यतांना सामोरे जाण्याची तयारी असावी, या उद्देशाने महापालिका क्षेत्रातील सर्व पर्जन्य जल उंदचन केंद्रांच्या ठिकाणी कत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारीदेखील गरजेनुसार पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर ठेवावेत आणि सर्व पर्जन्य जल उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने वापरली जातील यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.पर्जन्य जल उदंचन केंद्रांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला. शिवाय त्यांनी पावसाळ्यामध्ये नेहमी पाणी भरण्याच्या संभाव्य ठिकाणांनादेखील भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व तयारी कामांचा आढावा घेतला.