मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक कायम असताना, डिजिटल सेवेकडे वाढलेला कल, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, उपाययोजनांचा फायदा घेत सायबर भामटे फसवणूक करीत आहेत. अशात अनोळखी लिंक, ॲप उघडणे महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अधिकृत लिंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यासोबतच प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफिलिक्स सेवा किंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६० जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, आदी आमिषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
या ठगांनी खातेदारांना संदेश धाडून त्याद्वारे any desk, Quick Support, Team Viewer, Aur droid सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाइल व संगणकाचा अनधिकृत तांबा घेत फसवणूक करीत असल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
काय करावे?
अनोळखी लिंक, तसेच ॲप डाऊनलोड करू नये. कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नये. जेथे फसवणूक होतेय असे वाटत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचेही सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईतील ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे
२०१९ - ७७५ / ४०
२०२० - ५५८ / २१
२०२१ मेपर्यंत - २०३ /१८