रस्त्यातील खड्ड्यांपासून सावधान!

By admin | Published: August 17, 2016 03:43 AM2016-08-17T03:43:57+5:302016-08-17T03:43:57+5:30

पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईकर साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी तयारी करतात, महापालिकादेखील सज्ज होते, पण पावसामुळे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळेही मुंबईकरांच्या

Be careful of the potholes! | रस्त्यातील खड्ड्यांपासून सावधान!

रस्त्यातील खड्ड्यांपासून सावधान!

Next

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईकर साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी तयारी करतात, महापालिकादेखील सज्ज होते, पण पावसामुळे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळेही मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दररोज गाडी, बस, रिक्षा, बाइकने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना कंबरदुखी, पाठदुखी, मान दुखण्याच्या प्रमाणात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बाइकने प्रवास करणाऱ्यांमध्ये मान लचकणे, कंबर दुखण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही याचा अधिक त्रास होतो. जवळपास १०० रुग्णांपैकी २० रुग्णांना खडबडीत रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे पाठीच्या मणक्याचा त्रास उद्भवलेला असतो. पावसाळ्यात हे प्रमाण ४० टक्क्यांवर जाते, अशी माहिती आॅर्थोपेडिक्स तज्ज्ञ डॉ. सचिन भट यांनी सांगितले.
डॉ. भट यांच्या म्हणण्यानुसार, खड्ड्यांमुळे पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात (लम्बर वर्टिब्रे) किंवा कवटीच्या खाली असलेल्या पाठीच्या कण्याच्या भागात त्रास उद्भवतो. अचानक बसलेल्या झटक्यामुळे पाठीच्या स्नायूंना धक्का पोहोचू शकतो किंवा पाठीच्या कण्याचा खालचा भाग आपल्या जागेवरून सरकू शकतो. सतत बसणाऱ्या अशा धक्क्यांमुळे गंभीर स्वरूपाची पाठदुखी होऊ शकते. सध्याची रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि शक्यतो बाइक चालवताना खड्डे टाळावेत.
महिलांना खड्ड्यांचा अधिक त्रास होऊ शकतो. कारण अनेक महिलांना आॅस्टिओपोरोसिसचा त्रास असतो. अशा वेळी धक्का जोरात बसल्यास पाठीच्या कण्याला इजा होण्याचा धोका अधिक असतो. या खड्ड्यांमुळे मानेचे स्नायू दुखावणे, कण्याच्या वरचा भाग काहीसा सरकणे (सर्व्हिकल स्लीप डिस्क), पाय मुरगळणे इत्यादी समस्या सामान्यपणे आढळून येतात. यामुळे गुडघ्याच्या स्नायूंना इजा पोहोचू शकते, असे आॅर्थोपेडिक्स तज्ज्ञ डॉ. तेजस उपासनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Be careful of the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.