लक्ष असू द्या ! (चेंगराचेंगरीचे) पुढील स्टेशन आहे करी रोड...

By अोंकार करंबेळकर | Published: October 2, 2017 12:33 PM2017-10-02T12:33:23+5:302017-10-02T12:34:17+5:30

एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत

Be careful! (Stampede) Next station is Curry Road ... | लक्ष असू द्या ! (चेंगराचेंगरीचे) पुढील स्टेशन आहे करी रोड...

लक्ष असू द्या ! (चेंगराचेंगरीचे) पुढील स्टेशन आहे करी रोड...

googlenewsNext

मुंबई -  एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत. परळच्या पुढचे स्थानक करी रोडसुद्धा दररोज अशाच गर्दीला सामोरे जाते. 

करी रोड स्थानक हे सध्या परळ, लालबाग, वरळी येथे जाणा-या प्रवाशांसाठी आणि नोकरदारांना सेवा पुरवते. परळ, लोअर परळ, वरळी येथे नव्याने निर्माण झालेल्या ऑफिस डिस्ट्रिक्टची सगळी मदार याच स्थानकावर येऊन पडते. मध्य रेल्वेचे कल्याण, ठाणे, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर येथे जाणारे प्रवाशांना फक्त याच स्थानकांचा आधार आहे. करीरोड स्थानकाची निर्मिती ब्रिटिशांनी केली तिच मूळी रेसकोर्सवरील घोड्यांची वाहतूक करण्यासाठी. घोड्यांना येथे उतरवून रेसकोर्सवर नेण्यात येई. त्यामुळेच या स्थानकावरुन वर पुलावर येण्यासाठी जिन्याच्या एेवजी रॅम्प बांधण्यात आला आहे. १८६५ ते १८७५ या काळात बॉम्बे बरोडा अॅन्ड सेंट्रल इंडिया रेल्वेचे एजंट असणारे सी. करी यांच्या नावाने या स्थानकाला करी रोड, असे नाव देण्यात आले. 

परळ आणि वरळीच्या रस्त्यावरील गिरण्यांच्या जागी नव्या इमारती उभ्या राहून तेथे शेकडो कार्यालयं सुरू झाली. त्यामुळे आहे त्या पायाभूत सुविधेवरच वाढत्या संख्येने प्रवाशांचा भार पडू लागला. आज करी रोड स्थानकाचा परिसर हा मुंबईतील सर्वात गजबज असणा-या  काही परिसरांपैकी एक असावा. दुर्दैवाने गेल्या अनेक दशकांमध्ये सुविधांमध्ये प्रवाशांच्या संख्येनुसार फारसा बदल झालेला नाही. या स्थानकावरुन वरती पुलावर येण्यासाठी व एकेकाळी घोड्यांसाठी बांधलेल्या एकमेव रॅम्पचा वापर प्रवासी इतकी वर्षे करत आहेत. मागील वर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुस-या पुलाच्या कामाला सुरुवात केली. या पुलाचे काम सुरू असले तरी तो अाकारास येणारा पूल अत्यंत अरुंद आणि करी रोडच्या लोंढ्याला सामावून घेण्यास पुरेसा नाही हे आताच दिसत आहे. स्थानकातून एका वेळेस एकाच व्यक्तीला किंवा फारतर दोन व्यक्तींना आत-बाहेर करता येईल अशी (गैर)सोय पुलावरती दोन बाजूस करण्यात आलेली आहे.

संध्याकाळी 5.30  वाजेनंतर सर्व कार्यालयांतून लोक बाहेर पडले तर स्थानकामध्ये लोकल दिसत असूनही तेथे केवळ प्रवेशाच्या अरुंद जागेमुळे जाणे शक्य होत नाही. लालबाग हे गणपती मंडळ येथून सर्वात जवळ असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात येथील गर्दी आणखीच वाढते. संध्याकाळच्या वेळेस करी रोड स्थानकात प्रवेश करणे किंवा बाहेर येणे अत्यंत त्रासदायक काम असते. या गर्दीचे नियमन करण्यासाठी पोलिसांचीही नेमणूक प्रसंगी करावी लागते.

स्थानकाची ही स्थिती तर बाहेर पुलावरची ही स्थिती तशीच आहे. परळ व लोअर परळला जोडणा-या  या पुलाचे बांधकाम १९१५ साली करण्यात आले. शंभर वर्षे उलटून गेली तरी या पुलाचा वापर केला जात आहे. पुलाच्या कठड्यांवर आजही जुन्या गॅसच्या दिव्यांचे काही भाग दिसून येतात. पुलावरील पादचारी मार्ग आणि बाजूस बसणा-या विक्रेत्यांमुळे व फेरीवाल्यांमुळे चालणा-यांची आणखीच कोंडी होते व त्यांना रस्त्यावरुन चालावे लागते. हजारो प्रवासी या लहानशा स्थानकात एकाच वेळेस येतात आणि अरुंद जागेतून प्रवेश किंवा बाहेर पडतात याची धोक्याची सूचना प्रशासनाला वारंवार देऊन झालेली आहे.


'अल्पकाळात होणा-या सुविधांकडे लक्ष द्या'
रेल्वेला कोणत्याही सुविधा, पूल बांधण्यासाठी प्रवासी वाहतूक बंद असताना काम करावे लागते त्यामुळे अशी बांधकामे करण्यास एक दोन वर्षांचा काळ जातोच. परंतु काही सोयी तात्काळ करता येऊ शकतात व त्यासाठी वेळही कमी लागेल. करी रोड स्थानकात लोकांच्या येण्याजाण्याच्या अरुंद प्रवेशद्वाराजवळच तिकीट काढण्याची जागा व यंत्र आहेत. तिकिटासाठी लागलेल्या रांगांमुळे ही गर्दी आणखीच संथ होते व प्रवाशांची कोंडी होते. त्यामुळे ही तिकिटाची जागा थोडीशी बाजूला करता आली किंवा तसे बांधकाम करता आले तर नव्या उपाययोजना अस्तित्वात येईपर्यंत तरी गर्दीला कमी त्रास होईल. सध्या स्थानकात येण्याची अरुंद जागा आणखी मोठी करता येईल.- अनय जोगळेकर, कार्यकारी समिती सदस्य, राज्य मराठी विकास संस्था

Web Title: Be careful! (Stampede) Next station is Curry Road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.