सावधान, उघड्यावर कचरा जाळला तर काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:51 AM2023-11-09T11:51:21+5:302023-11-09T11:51:21+5:30

हवेची सातत्याने घसरत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पालिका उगारत आहे.

Be careful, what happens if garbage is burned in the open? | सावधान, उघड्यावर कचरा जाळला तर काय होणार?

सावधान, उघड्यावर कचरा जाळला तर काय होणार?

मुंबई :

हवेची सातत्याने घसरत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पालिका उगारत आहे. यामुळे कचरा उघड्यावर जाळणाऱ्यांची आता खैर न करता पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर तक्रार केल्यास लागलीच पालिकेचे वॉर्ड पथक त्यावर कारवाई करणार आहे. 

उघड्यावर तसेच डम्पिंग ग्राउंडवर झाडांचा पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक आणि ई-कचरा उघड्यावर जाळल्याने मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ होत असल्याच्या घटना शहरात वाढत आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण नियमावलीत पालिकेने उघड्यावर कचरा जाळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. 

मुंबई शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून पालिकेकडून हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या दरम्यान परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने अनेकदा तो कचरा जाळला जातो. मात्र, कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञ देतात. 

कचरा जाळण्यावर बंदी
  उघड्यावर टाकलेला कचरा, प्लास्टिकचा कचरा, ई-कचरा त्यातून काढून टाकण्यासाठी प्रभागनिहाय विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. 
  घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार, भरावाची जागा, सार्वजनिक जागा आणि इतर ठिकाणी कचरा जाळण्यास मनाई आहे. 
  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने डिसेंबर २०१६ मध्ये उघड्यावर कचरा जाळण्यावर देशव्यापी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

दंड किती ? 
पालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य उपविधी, २००६ नुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या वा स्वच्छतेचे नियम धुडकावणाऱ्यांसाठी पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे. या ठरवून दिलेल्या नियमांनुसार मुंबईत दंडाची वसुली होत असून यात उघड्यावर कचरा जाळणे, स्नान, लघवी, मलविसर्जन करणे यासाठी अवघे १०० ते २०० रुपये दंड ठरवून देण्यात आला आहे.

कायदा काय सांगतो?
  कचरा उघड्यावर जाळणे हा पर्यावरण कायदे आणि भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसारही गुन्हा आहे. स्थानिक प्रशासनाला यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. 
  एका प्रकरणात तर राष्ट्रीय हरित लवादाने उघड्यावर कचरा पेटविणाऱ्याला एक लाख रुपये दंड केला होता. प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. 
  कचरा जाळण्याबरोबरच ज्याच्या आवारात जो जाळला गेला आहे, त्यालाही कायद्यानुसार जबाबदार ठरवता येते. मात्र, आज १०० रुपये भरून पालिकेच्या कारवाईतून कुणीही सहज सुटू शकतो.

Web Title: Be careful, what happens if garbage is burned in the open?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.