मुंबई : मुंबई शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतेच व्यक्त केले. दहिसर (पश्चिम) कांदरपाडा येथील आयसीयू कोविड सेंटरची पाहणी करत तेथील त्यांनी येथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मुंबै बँक संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.
दहिसर (पश्चिम) कांदरपाडा कोविड सेंटर येथील रुग्ण बरे होण्याची आकडेवारी उत्तम असून शासनाने कमी वेळात येथे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करत रुग्णांना दिली जाणारी औषधे, त्याची उपलब्धता याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रकृती विषयी कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती देण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र मेहनत घेत असून नागरिकांनी देखील गर्दीच्या वेळी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी ऑक्सीजन साठा उपलब्धतेविषयी त्यांनी माहिती घेतली. तसेच सेंटरच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
डॉ.दीपक सावंत यांनी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित डॉक्टरांना दिले. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य उंचावल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी देखील त्यांनी आस्थेने चौकशी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख राजू इंदुलकर, युवा सेनेचे जतिन परमार उपस्थित होते.