मुंबई : मान्सूनने मुंबईत आता चांगलाच वेग पकडला आहे. पावसात ठिकठिकाणी पडझड होते. आपत्कालीन घटना घडतात. अनेक वेळा या आपत्कालीन घटना विजेशी निगडित असतात. त्यामुळे मुंबईकरांनी विजेची उपकरणे हाताळताना सुरक्षा बाळगावी, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.पावसाळ्यात वीजपुरवठा सातत्याने सुरू राहावा यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे. सुविहित प्रतिसाद, फेरप्राप्ती (रिकव्हरी) आणि सेवा पुन्हा सुरू करण्याच्या (रिस्टोअर) योजना संबंधित संरचनांमध्ये राबवल्या जात आहेत. पावसाळ्याच्या काळात नेहमी भेडसावणारी वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या हाताळण्यासाठी सेंट्रल डिझास्टर कंट्रोल रूमही कार्यान्वित केली आहे, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीकडून देण्यात आली. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवता यावी आणि पाणी साचल्यामुळे होणाऱ्या घटनांदरम्यान सेवा त्वरित रुळावर आणता यावी यासाठी महापालिकांसोबत समन्वय साधला जात आहे. पावसाळापूर्व तपासण्या तसेच साधनांच्या प्रतिबंधात्मक देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला अतिरिक्त साहाय्य पुरवण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाºया अपघातांची माहिती कळवता यावी म्हणून अतिरिक्त हेल्पलाइन्सही सक्रिय करण्यात आल्या आहेत. पथकांना आवश्यक तेवढ्या वाहतूक सुविधा आणि अतिरिक्त आपत्कालीन दुरुस्ती साधने पुरवण्यात आली आहेत. सामाजिक अंतर पाळत सर्व वैद्यकीय, प्रशासकीय तसेच साधन पुरवठा आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत.>हे करा : परिसरात वीजपुरवठा करणारे मीटर केबिन पाण्यापासून तसेच गळतीपासून योग्य पद्धतीने सुरक्षित करण्यात आले आहे याची खात्री करून घ्या. वायरिंगमध्ये काही बदल केल्यास त्यांची पूर्णपणे तपासणी करून घ्या. परवानाप्राप्त इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडून चाचणी करून घ्या. घरात टॉर्च आणि मेणबत्त्या सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवा.>हे करू नका कोणत्याही विद्युत आस्थापनाला ओल्या हाताने किंवा हॅण्डग्लोव्हज्, सेफ्टी शूज, इन्सुलेटेड प्लॅटफॉर्म यांचा वापर न करता स्पर्श करू नका. मंजूर भाराहून (सॅक्शण्ड लोड) अधिक वीज वापरू नका. मीटर केबिनमध्ये, पथदिव्यांच्या खांबांवर किंवा वितरण स्तंभावर ठिणग्या दिसल्या तर त्यांना अजिबात स्पर्श करू नका.
विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:56 AM