ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:08 AM2021-09-16T04:08:53+5:302021-09-16T04:08:53+5:30
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख करायची, कधी पायलेट तर कधी इंजिनिअर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. सावज जाळ्यात येताच ...
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख करायची, कधी पायलेट तर कधी इंजिनिअर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. सावज जाळ्यात येताच परदेशातून महागडे गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली बनावट कस्टम अधिकाऱ्याच्या मदतीने फसवणूक करण्याच्या घटनांमुळे हात पिवळे होण्यापूर्वीच खिसा रिकामा होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ऑनलाइन जोडीदार शोधताना सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
सायबर पोलिसांसह मुंबई पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या कारवाईत नायजेरियन नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. विनोबा भावे नगर पोलिसांनी यावर्षीच्या सुरुवातीलाच अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या नायजेरियन दुकलीचा पर्दाफाश केला
दिल्लीतून कस्टम अधिकारी असल्याचे सांगून कॉल करणाऱ्या जासिंटा ओवोकोनू ओफाना (वय २६) या महिलेला जेरबंद केले आहे. कुर्ला परिसरात राहणाऱ्या महिलेला नायजेरियन आरोपी डायबी अमारा ऊर्फ डॅनियल (३१) याने रशिया देशात पायलेट असल्याचे सांगून संवाद साधला. पुढे याच मैत्रीतून तरुणीला यूकेमधून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले. पुढेे हे गिफ्ट दिल्ली विमानतळावर येताच जासिंटाने कस्टम अधिकारी असल्याचे सांगून वेगवगेळ्या शुल्काच्या नावाखाली १७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्ली कनेक्शन समोर आले. त्यानुसार पथकाने दिल्लीतील टिळक नगर भागातून जासिंटाला अटक केली आहे. या दुकलीने मुंबईसह राज्यभरात अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पथकाला आहे. अशाच प्रकारे कुठे आर्थिक फसवणूक होते, तर कुठे महिला लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरताना दिसत आहेत.
....
गोपनीय माहिती शेअर करू नका..
ऑनलाईन जोडीदार शोधताना त्याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती, पासवर्ड तसेच वैयक्तिक फोटो शेअर करू नका. पैशाची मागणी होताच, वेळीच सतर्क होत संवाद थांबवा. कुणावर संशय असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.
...
ज्येष्ठ नागरिकांसह घटस्फोटीत महिला टार्गेट
ज्येष्ठ नागरिकांसह घटस्फोटीत तसेच वयस्कर महिला यात सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत.