मुंबई :
जवळपास ८ हजार ५०० रुपयांची रेल्वे तिकिटे रद्द करू इच्छिणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला सायबर फसवणुकीत लाखाचा गंडा घालण्यात आला. त्यांनी गुगलवर सर्च केल्यानंतर त्यांना एक फसवा हेल्पलाइन नंबर मिळाला. फसवणूक करणाऱ्याने त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले.
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाडच्या रहिवाशाने आपल्या कुटुंबाचे वाराणसीसाठी तिकीट बुक केले होते. मात्र काही कारणाने त्यांना तिकिटे रद्द करायची होती. त्यांनी इंटरनेटवर हेल्पलाइन नंबर शोधला. कॉल तिकीट संबंधित मदत या शीर्षकाखाली एक मोबाइल नंबर आला. तक्रारदाराने त्या नंबरवर फोन केला आणि स्वतःला हेल्पलाइन एक्झिक्युटिव्ह सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांना फसविले. तिकीट रद्द करण्यासाठी त्यांचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर मागण्यात आला. तक्रारदाराने तो दिला. त्यानंतर त्यांच्या फोनवर दोन वन-टाइम पासवर्ड आले, त्यांनी ते कॉलरसोबत शेअर केले. पीडिताला लिंकही शेअर केली. त्यात तिकीट रद्द करण्याचा फॉर्म असून तो भरण्यास सांगितले. मात्र त्यानंतर बँक खात्यातून रक्कम काढली.