लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात अनेकांना नोकरी गमावणं, पगार कपात किंवा असलेल्या नोकरीत अनिश्चितता यांचा सामना करावा लागला आहे. मात्र, पाचवी पासपासून ते बीई, एमबीए पदवी प्राप्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून मुंबईत शनिवारी महारोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पाचवी पास विद्यार्थ्यांसाठी डिलीव्हरी एक्झिक्युटीव्हच्या कामासाठी तीन हजार पदे उपलब्ध करून देण्यात आली. होमकेअर नर्ससाठी एका कंपनीने २०० पदांसाठी मुलाखती घेतल्या. विविध कंपन्यांनी अशा एकूण नऊ हजार २७८ पदांसाठी शनिवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळ असलेल्या राणीबाग मैदानात शनिवारी हा मेळावा पार पडला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा तसेच शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. याला विद्यार्थी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.
मुंबईतील दुसरा महारोजगार मेळावा आमच्या विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी मुंबईमध्ये मागील आठ दिवसांत हा दुसरा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येणार असून ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे कौशल्य विकासमंत्री लोढा यांनी सांगितले. याशिवाय अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शालेय शिक्षण विभाग पुढाकार घेत आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, एचसीएल, ॲमेझॉनसारख्या नामांकित संस्था, कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ऑफिस बॉयपासून कौन्सेलर पदापर्यंतच्या जागांसाठी मुलाखती पाचवी पास, दहावी- बारावी पास- नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, डी.एड., बीएड पदवीधारक, एमबीए अशा विविध पात्रताधारकांसाठी मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरबसल्या काम करण्यासाठीही रेसिडेन्ट जिओ असोसिएटसारख्या पदांकरिता काही कंपन्यांनी मुलाखती घेतल्या गेल्या आहेत.