Join us  

‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 6:42 AM

मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज, शनिवारी त्यात आणखी भर पडणार आहे. लोकलच्या तब्बल ५३४ फेऱ्या रद्द होणार असून, मुख्य मार्गावरील सर्व लोकल भायखळ्यापर्यंतच चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे त्रासासाठी मुंबईकरांना तयार राहावे लागणार आहे.

सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाट विस्तारीकरणाचे काम गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले. त्यामुळे घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक रविवार दुपारी ३.३० पर्यंत चालणार आहे. शुक्रवारी सकाळी जम्बो ब्लॉकचा परिणाम जाणवला. अप आणि डाउन दिशेकडील लोकल सुमारे ४५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे गाड्या आणि स्थानकांत गर्दीचे चित्र होते. अनेकांनी लोकलपेक्षा एसटी, बेस्ट, टीएमटी किंवा केडीएमटीच्या बसना प्राधान्य दिले होते. 

दुपारनंतर लोकल रिकाम्या धावत होत्या. शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, रविवारचे वेळापत्रक लागू केले जाणार आहे. सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे लोकल हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यंत, तर मुख्य मार्गावर भायखळ्यापर्यंत चालविण्यात येणार आहे. मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आले आहे. शिवाय बहुतांशी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी द्यावी, असे विनंतीही रेल्वेच्या वतीने कार्यालयांना करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दोनपरीक्षा पुढे ढकलल्या

  • मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेत मुंबई विद्यापीठाने शनिवारी, १ जून रोजी होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
  • रद्द झालेल्या या दोन परीक्षा आता ८ जून रोजी घेण्यात येणार आहेत. शनिवारी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक व बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ ची एक अशा दोन परीक्षा होत्या.
  • ३१ मे रोजी विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या. परंतु रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम या परीक्षांवर झाला नाही. शिक्षक, कर्मचारी, आधिकारी यांना आज, १ जून रोजी कार्यालयात येणे गैरसोयीचे होईल. यामुळे विद्यापीठाने सुट्टी जाहीर केली आहे. 
टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई लोकलमुंबई विद्यापीठपरीक्षा