हाजीर हो..! मुंबईसह सहा महापालिका आयुक्तांना उच्च न्यायालयाने बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:47 AM2023-08-10T09:47:22+5:302023-08-10T09:47:30+5:30
रस्ते व फुटपाथ खड्डेमुक्त न करणे हा न्यायालयाच्या आदेशांचा अवमानच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाच वर्षांपूर्वी निर्देश देऊनही रस्ते व फुटपाथ खड्डेमुक्त ठेवण्यात महापालिका अयशस्वी ठरल्याने उच्च न्यायालयाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिंवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांच्या आयुक्तांना तसेच एमएमआरडीए आयुक्त, शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
रस्ते, फुटपाथच्या दुरुस्ती व खड्डेमुक्त करण्यासंदर्भात २०१८ मध्ये आदेश देण्यात आले होते. खड्डे बुजविण्यासाठी पाच वर्षे पुरेशी नाहीत का? तुम्ही न्यायालयाचा अवमान केला आहात...तुमच्या महापालिका आयुक्तांना हजर राहायला हवे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वैयक्तिकपणे जबाबदार धरल्याशिवाय कारवाई होणार नाही, असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल आणि न्यायालयाची अवज्ञा करण्यासाठी का जबाबदार धरू नये, हे स्पष्ट करण्यासाठी मुंबई व अन्य पालिकांच्या आयुक्तांची उपस्थिती आवश्यक आहे. सर्वांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगा, असे आदेश न्यायालयाने दिले.
व्यवसायाने वकील असलेल्या रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डा की तळे?
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणपतीपूर्वी बुजविण्याचे आश्वासन देऊनही अदयाप खड्डे बुजविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. इंदापूर -कासू या पट्टट्यात खड्डे पडल्याने रस्त्याचा काही भाग बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पडलेला खड्डा, हा खड्डा आहे की तळे? हेच समजेना. याचिकाकर्ते ओवेस पेचकर यांनी या खड्डाचा व्हीडिओ न्यायालयाला दाखवताच मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली.
दुचाकीस्वाराचा मृत्यू ; समितीची नियुक्ती
गेल्याच महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सूरज गवारी याचा कल्याण-श्री मलंगगड रस्त्यावर अपघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले. या रस्त्यावरील खड्डा चुकवित असताना सूरजची दुचाकी डम्परवर आदळली. मात्र, केडीएमसीने हा दावा फेटाळला आहे. संबंधित रस्ता अरुंद आहे आणि रस्त्यावर खड्डा नसल्याचा दावा पालिकेने न्यायालयात केला. दुचाकीस्वाराचा मृत्यू खड्डयामुळे झाल्याचा आरोप पालिकेने फेटाळला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू खड्ड्यामुळे झाला की नाही, हे शोधण्यासाठी दोन वकिलांची समितीची नेमणूक करत आहोत. असे न्यायालयाने म्हटले.