धर्माचा अभिमान बाळगा, मात्र उन्माद नको; राज ठाकरेंचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 07:24 AM2023-04-27T07:24:55+5:302023-04-27T07:25:24+5:30
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात सडेतोड मुलाखत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर देशभर दंगे झाले; परंतु ते तेवढ्याच तात्कालिक कारणास्तव झाले नाहीत. १९८० किंवा त्यापूर्वीपासून हिंदूंच्या मनात खदखद होती. शहाबुद्दीनसारखे नेते विखारी भाषा करीत होते. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संसदेने तो निकाल निष्फळ ठरवला होता. त्यामुळेच देशात हिंदुत्वाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्वाचा उन्माद नको; पण अभिमान हा असायलाच हवा. देशातील प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायला हवा हेच माझे मत आहे; पण माझ्या मराठीला किंवा धर्माला नख लावले तर मी मराठी माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून अंगावर येणार म्हणजे येणारच, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. या दोघांनीही राज यांच्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत त्यांच्या प्रश्नांचे चेंडू सीमेपार टोलवले. अनेकदा राज यांनी मुलाखतकारांना कोपरखळ्या मारल्या.
कोल्हे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगत राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून त्यांना छेडले असता राज म्हणाले की, माझ्या आजोबांच्या वेळची परिस्थिती व आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. मी धर्मवेडा नाही. माझे अनेक मित्र मुसलमान आहेत. मशिदीवरील भोंग्यामुळे मुस्लिमांनाही त्रास होतो. माहीम येथील अनधिकृत बांधकामाला विरोध केला नसता तर तेथे दुसरे हाजीअली उभे राहिले असते. आपला महाराष्ट्रातील पोलिसांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांच्या ताब्यात ४८ तास सर्व काही द्या ते साफ करतील. आपल्याकडे कायदे आहेत; पण ऑर्डर नाही. सत्तेवर टेंपररी बसलेल्या लोकांकरिता पोलिस जोखीम का स्वीकारतील व तुरुंगात का जातील, असे ठाकरे म्हणाले.
कुणाचा बायाेपिक यावा?
बायोपिक करण्याकरिता माणूस तेवढा तोलामोलाचा हवा, असे सांगून राज म्हणाले की, इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्यावर बायोपिक केला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जागतिक दर्जाचा तीन भागांतील चित्रपट निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या चित्रपटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक काम करतील.
लाव रे तो व्हिडीओ... आले कुठून?
लाव रे तो व्हिडीओ ही कल्पना निवडणुकीच्या वेळी सुचली नाही. मुंबई शहरातील अनधिकृत झोपड्यांचे फोटो काढले होते. त्याचे प्रेझेंटेशन बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा जेवढा प्रभाव पडतो तेवढा अन्य कशाने पडत नाही. सरकार कुणाचेही असले तरी त्याला आरसा दाखवलाच पाहिजे. अन्यथा लोकशाही कसली, असे मत राज यांनी व्यक्त केले.