कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ’ मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 11:15 PM2021-02-24T23:15:05+5:302021-02-24T23:15:10+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नाका तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आता मुंबई मेट्रो प्रशासनदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नाका तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या वतीने विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेच लक्षात घेता आता मेट्रो प्रवासात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर देखील मेट्रो प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोच्या बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ मोहिमेअंतर्गत आता ही कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या मुंबई मेट्रोचा दिवसाला २५६ फेऱ्या सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात मेट्रो मधून एक लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. लोकल सुरू झाल्यापासून या प्रवाशांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या ठिकाणी अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यासाठीच आता मेट्रो प्रशासनाने बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना सतत मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व मेट्रो स्थानकांवर याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रवासी विना मास्क आढळल्यास त्याला पहिल्यांदा सूचित करण्यात येईल आणि तरीही तो न ऐकल्यास त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.