मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेत राहत असलेल्या जास्तीत जास्त मतदारांच्या नावाची नोंदणी ३१ आॅक्टोबरपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मतदार यादीत आपले नाव आहे ना? याचीही खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास ३१ आॅक्टोबरपर्यंत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नुकतीच मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक आणि उपनिबंधक, सहकारी संस्था त्यांची, तसेच महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनसोबत बैठक आयोजित केली होती, अशी माहिती महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली.बैठकीत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष, सचिवांना व महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे महासेवक त्यांना मतदान केंद्रस्तरिय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी पार पाडत लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले.१ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर, २०१८ या कालावधीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांना नव्याने मतदार नोंदणीकरिता नमुना ६, मृत/कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणीसाठी-नमुना क्रमांक ७, तसेच मतदार यादीतील नावाची किंवा तपशिलाची दुरुस्ती करण्याकरिता नमुना क्रमांक ८, एका विधानसभा मतदार संघातून दुसऱ्या विधानसभा मतदार संघात स्थलांतरित झाले असल्यास, नाव नोंदणीकरिता-नमुना क्रमांक ८ असे अर्ज पदनिर्देशित अधिकारी किंवा महासेवक (मतदान केंद्र स्तरिय स्वयंसेवक) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. नागरिकांनी मतदार यादीत नोंदणी केल्यास बोगस मतदानाचे प्रमाण कमी होऊ शकेल़ मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप होणार नाही.यादीत नाव आवश्यककेवळ छायाचित्र मतदार ओळखपत्र आहे, म्हणून मतदान करता येईल, असे नाही, तर मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरूनऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमाविण्याची वेळ येणार नाही.नमुना ६ : मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज.नमुना ६ अ : मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने करावयाचा अर्ज.नमुना ७ : मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज.नमुना ८ : मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज.नमुना ८ अ : मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी अर्ज.
मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 1:18 AM