Join us

नवजात शिशूंच्या प्रकृतीबाबत अतिदक्ष राहा; उपचार यंत्रणेने घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 3:51 AM

राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारताना तेथील सोईसुविधा, अभ्यासपद्धती प्रयोगशाळा आदींच्या बाबतीत योग्य विचार करावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा कशा वाढतील, हेदेखील पाहावे.

मुंबई : राज्यातील नवजात शिशूंना जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घ्या. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये या ठिकाणी असलेल्या सोईसुविधा यांचा जास्तीतजास्त उपयोग रुग्णांसाठी करण्यात यावा. औषधे व उपचार यंत्रणाही रुग्णांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची असते. याची कमतरता भासू नये, त्याबाबतही काळजी घ्यावी. उपचार यंत्रणा नादुरुस्त होणार नाही हे पाहावे. या सेवांकरिता आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, रुग्णांवर योग्य उपचार हे झालेच पाहिजेत, प्रामुख्याने नवजात शिशूंच्या संदर्भात अतिदक्ष राहण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण, तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, हाफकीनचे संचालक राजेश देशमुख व निशिगंधा नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते. शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

कोणतेही काम करताना त्यात समयबद्धतेने काम करावे, तसेच आपण विभागामार्फत जे काही काम करतो, त्याबाबत त्र्ययस्थ मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. आपण करीत असलेली कामे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, देत असलेल्या सोईसुविधा याचा योग्य विनियोग होतो का नाही? याची तपासणी करण्यासाठी (थर्ड पार्टी आॅडिट) त्रयस्थ पक्षांकडून मूल्यमापन करण्यात यावे. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होऊन यंत्रणेत काही दोष असतील, तर तेही दूर होण्यास मदत होईल, असे देशमुख यांनी सांगितले.‘त्या’ महाविद्यालयांची यादी कराराज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारताना तेथील सोईसुविधा, अभ्यासपद्धती प्रयोगशाळा आदींच्या बाबतीत योग्य विचार करावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा कशा वाढतील, हेदेखील पाहावे. ज्या नर्सिंग महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोईसुविधा नाहीत, त्यांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी शिकत असलेल्या विद्यार्थिनींसाठी योग्य शिक्षण मिळालेच पाहिजे. त्या संदर्भात अधिक लक्ष द्यावे, असेही देशमुख यांनी बैठकीत सांगितले.

 

टॅग्स :अमित देशमुख