मुंबई : पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील ८ हजार सफाई कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात महिनाअखेर केवळ एक रुपया जमा झाला आहे. पालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
आयकर विभागाच्या नियमाप्रमाणे ३१ मार्च ही आधार आणि पॅन लिंक करण्याची शेवटची मुदत होती. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक कर्मचाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण केली गेली नसल्याने त्याचा परिणाम थेट त्यांच्या पगारावर झाला आहे.
कर्मचाऱ्यांकडून आता आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी लगबग सुरू झाली तरी प्रक्रिया पूर्ण होऊनही मार्चचा त्यांचा पगार होईल की नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत शिवाय अनेकांचे आधार, पॅनकार्ड लिंक असूनही त्यांच्या पगारात कपात झाल्याचे समोर आले आहे. याबाबतीत त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर त्यांना थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नाहक बसला फटका-
मागच्या नोव्हेंबरमध्ये मी माझे आधार आणि पॅनकार्ड लिंक केले आहे. तरी माझ्या पगारात कपात झाली असल्याची माहिती संजय पवार (नाव बदललेले आहे) यांनी दिली. ते ‘पी’ दक्षिण विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पगार ३५ हजार महिना इतका आहे. आमच्यातील अनेक सहकारी तर ज्येष्ठ असून त्यांना यातील माहितीही नाही, त्यामुळे पालिकेने स्वतः कार्यशाळा घेऊन किंवा सूचना देऊन याची अंमलबजावणी करून घ्यायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
संघटनांकडून संताप-
पालिकेच्या ‘द म्युनिसिपल युनियन संघटने’कडून पालिकेच्या कृतीवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. परस्पर, एकतर्फी व कोणतेही कारण न देता कामगारांचे संपूर्ण वेतन न देण्याचे ठरविल्याने वेतनातील कपात किमान वेतन कायदा १९४८ च्या कायदेशीर तरतुदीचा भंग ठरत असल्याचा आरोप म्युनिसिपल युनियनने केला आहे. त्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. पगाराअभावी कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार लक्षात घ्यावी आणि मार्च महिन्याची कपात थांबाबी, अशी मागणी केली आहे.
पगाराविना कामगारांच्या वेतनातून कपात होणारे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज व आयुर्विमा यांचे मासिक हप्ते, शैक्षणिक शुल्के थकणार आहे. सफाई कामगारांना योग्य मुदत देऊन त्यांचे मार्च महिन्याचे वेतन पालिकेने वेळेत द्यावे.- रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन.