बीच क्लीनिंग मोहीम बंद झाली, १०० टन कचरा अद्यापही समुद्रकिनारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:04 AM2017-11-21T02:04:44+5:302017-11-21T02:04:47+5:30
महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाच्या असहकार्यामुळे हताश होत या मोहिमेचे जनक अॅड. आफरोज शाह यांनी कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
मनोहर कुंभेजकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड स्टेट्सच्या पर्यावरण प्रमुखांनी गौरवलेली वर्सोवा बीच क्लीनिंगची स्वच्छता अखेर मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाच्या असहकार्यामुळे हताश होत या मोहिमेचे जनक अॅड. आफरोज शाह यांनी कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी ही बीच स्वच्छता मोहीम, असा गौरव युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण प्रमुखांनी गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंती दिनी येथे भेट दिली, तेव्हा त्यांनी केला होता. वेसावा कोळी जमात ट्रस्ट व वर्सोवा रेसिडेंट्स व्हॉलेंटिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत वर्सोवा बंदर स्वच्छता मोहिमेचा १००वा आठवडा दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला होता.
२ आॅक्टोबर २०१५ रोजी येथील गंगा भवनसमोरील एव्हरेस्ट सोसायटीत राहणारे आफरोज शाह यांनी बकाल वर्सोवा बंदर स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितले होते. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांच्या वर्सोवा रेसिडंट आॅर्गनायझेशन (व्हीआरव्ही) आणि वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या तीन किमी वर्सोवा बंदर स्वच्छता मोहिमेला रविवारी १०९ आठवडे पूर्ण होणार होते. दर शनिवार आणि रविवारी येथील स्वछता मोहिमेतून २ ते ३ टन कचरा गोळा होतो. मात्र वारंवार के-पश्चिम विभागाचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांना आणि येथील लोकप्रतिनिधी यांना भेटूनसुद्धा गेले चार महिने येथील समुद्रकिनारी जमलेला सुमारे १०० टन कचरा अद्यापही उचलण्यात आलेला नाही. जर पालिका प्रशासनाला येथील स्वछता मोहिमेचे गांभीर्य नसेल तर ही मोहीमच आता १०९ आठवड्यांनंतर रविवारपासून कायमचीच बंद करण्याचा निर्णय आफरोज शाह यांनी घेतला आहे, अशी माहिती वेसावा कोळीवाड्यातील प्रवीण भावे आणि राजहंस टपके यांनी दिली.
आमदार भारती लव्हेकर यांनी याबाबत सांगितले की, शाह हे चांगले काम करत असून त्यांच्या या मोहिमेला माझे सहकार्य आहे. येथे साचलेला कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यासाठी मी के-पश्चिम विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील यांच्या समवेत के-पश्चिम विभाग कार्यालयात सहायक पालिका आयुक्त गायकवाड आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेतली. येत्या तीन दिवसांत २ जेसीबी आणि डम्पर उपलब्ध करून येथील साचलेला कचरा उचलण्यात येईल.
सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, रोज येथे १ ट्रक कचरा गोळा करण्यात येतो. अलीकडेच पडलेल्या पावसामुळे येथे चिखल झाला होता. कचरा गोळा करणारे ट्रक येथील वाळूत रुतून बसत असल्यामुळे येथील कचरा काढला गेला नव्हता. व्हीआरव्ही दर शनिवार आणि रविवारी गोळा करत असलेल्या कचºयात मोठ्या प्रमाणात वाळू असते. त्यामुळे कचरा आणि वाळू वेगळी करण्यात वेळ जातो. सोमवारी १० ट्रक कचरा येथून उचलला आहे.वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी सांगितले की, पालिकेने गेल्या जूनपासून येथील जमा झालेला कचरा उचलला नव्हता. वेसावे कोळीवाड्यात रोगराई पसरून प्रत्येक घरात
१ ते २ नागरिक आजारी पडले होते. शाह हे चांगले काम करीत असून, महापालिकेने त्यांच्या मोहिमेला सहकार्य केले पाहिजे.