मुंबई : हिवाळ्यात गुलाबी थंडीत पर्यटनाकडे अधिक नागरिकांचा कल असतो. त्यामुळे वर्षाखेरीसच्या वीकेंड्साठी राज्यातील अनेक पर्यटनस्थळांच्या बुकिंगकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांचा अधिक कल निसर्गाच्या कुशीत रमण्याकडे आणि समुद्रकिनाऱ्यांवर वेळ घालविण्याकडे अधिक आहे.
राज्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगरकडे, हिरवीगार झाडे, शुद्ध थंड हवा, तलाव यांची रेलचेल असलेल्या अनेक पर्यटनस्थळांचे बुकिंग फुल्ल होत असल्याची माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील पर्यटक भंडारदरा धरण, रंधा फॉल्स, अम्ब्रेला फॉल्स, रतनवाडी, पवना, कर्जत अशा विविध ठिकाणांवर भेटी देऊन कॅम्पिंग आणि ट्रेकिंगचा अनुभव घेताना दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नववर्षाच्या स्वागतासाठी नव्या ठिकाणांचा पर्यटक शोध घेत असून, जवळच्या ठिकाणांना पसंती दिली जात आहे. पर्यटनासाठी खासगी गाड्यांचा वापरही वाढला असून, आपली गाडी घेऊन पर्यटनाला जाण्यास अधिक पसंती मिळत आहे. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासह स्थानिक रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.- चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, पर्यटन विभाग
या ठिकाणी पसंती :
राज्यातील महाबळेश्वर, चिखलदरा, पाचगणी, गगनबावडा, भंडारदरा, तोरणमाळ, अलिबाग, गणपतीपुळे, इगतपुरी, ताडोबा, माथेरान या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. हिवाळ्याच्या सुट्यांत जम्मू-काश्मीर, लेह-लदाख, हिमाचल प्रदेश व दक्षिणेकडे केरळमध्ये कुटुंबासह पर्यटनास जाणाऱ्यांची गर्दी असते. याखेरीज राजस्थान, उदयपूर या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पसंती दिसून येते.