Join us

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणारे किनारे यंदा एकाकीच; कुठे नाकाबंदी तर कुठे सेगवेवरून गस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 2:38 AM

कोरोनाचा फटका, पोलिसांनी दिला चोख पहारा, मुंबईकरांनी केले घरीच सेलिब्रेशन

मनिषा म्हात्रेमुंबई : दरवर्षी थर्टी फर्स्टनिमित्ताने फटाक्यांच्या आतषबाजीत गजबजणाऱ्या समुद्रकिनारी, कोरोनामुळे लागू केलेल्या नाइट कर्फ्यूमुळे शुकशुकाट पाहावयास मिळाला. नाकाबंदी, गस्त तसेच ड्रोनद्वारे मुंबई पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.  

मुंबईत थर्टी फर्स्टनिमित्ताने  पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीस प्रत्येक घडामोडीवर मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून होते. त्यात मुंबईत नाइट कर्फ्यू असल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, नाकाबंदी करण्यात आली आहे.  या वर्षी कुठल्याच पार्टीला परवानगी देण्यात आलेली नव्हती.  पोलीस ड्रोनद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. यात समुद्रकिनारी शुकशुकाट पाहावयास मिळाला. रात्री ११ नंतर जुहू, वांद्रे, वरळी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट परिसरात नागरिकांना रात्री ११ पूर्वीच घरी धाडण्यात आले. त्यामुळे या परिसरात शांतता पाहावयास मिळाली.

गिरगाव : गिरगाव परिसरातही पोलिसांच्या गस्तीमुळे रात्री ११ नंतर नागरिक घराबाहेर निघाले नाहीत. छोट्या वाडीतही हीच परिस्थिती होती. नागरिकांनी स्वतःच घराबाहेर पडणे टाळलेले दिसून आले.

माझगाव : माझगाव कोर्ट परिसरातही शांतता होती. महिला पथकही माझगाव, भायखळा, नागपाडा परिसरात फिरताना दिसून आले.

आनंद नगर टोल नाका : मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर टोल नाका परिसरात पोलीस नाकाबंदी करून मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना दिसून आले. त्यात म्हाडा कॉलनी, संभाजी मैदान परिसरातही नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. 

कुलाबा : कुलाबा परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. या भागातील पब, रेस्टॉरंटबाहेर पोलिसांची गस्त सतत सुरू होती. 

रात्री ११ नंतर रेस्टॉरंट, पब, हुक्का पार्लरही पोलिसांच्या गस्तीमुळे लॉक झालेले पाहावयास मिळाले. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून वाहने आणि व्यक्तींची तपासणी केली. सोबतच वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ अशा मोहिमा राबविण्यात आल्या. यात, जवळपास ३ हजार वाहतूक पोलीस ९४ टीममध्ये कार्यरत होते. 

 

टॅग्स :नववर्षपोलिस