आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:07 AM2021-04-08T04:07:40+5:302021-04-08T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने, सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने, सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. सलूनही महिनाभर बंद असल्याने आता दाढी आणि केस घरातच कापावे लागणार आहेत.
महिनाभर ग्राहकांची गैरसोय होणार असली, तरी सलून चालक आणि त्यावर अवलंबून असलेल्या कारागिरांचे मोठे हाल होणार आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जवळपास पाच महिने दुकान बंद ठेवावे लागल्यामुळे सलून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. कारागिरांची तर उपासमार होऊ लागल्यामुळे त्यांनी थेट गाव गाठले. डिसेंबरनंतर या स्थितीत हळूहळू सुधारणा होऊन व्यावसाय पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले, परंतु पुन्हा रुग्णवाढ होऊ लागल्याने, मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, सलून महिनाभर बंद राहणार आहेत, पण आधीच तोट्यात असलेल्या सलून व्यावसायिकांसमोर यामुळे गहिरे संकट उभे राहिले आहे. हातावर पोट असलेल्या कारागिरांना तर कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न पडला आहे.
........
मुंबई आणि परिसरातील एकूण केशकर्तनालये
१.५ लाख
...
त्यावर अवलंबून असलेले कामगार
४ लाख
...............
भाडे निघणेही होत आहे अवघड!
पहिल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक पूर्णतः कोलमडून पडले. त्यातून सावरत असतानाच पुन्हा दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आधीच ग्राहकसंख्या कमी झाली. त्यातून निर्बंध पालनासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. या निर्बंधांच्या जोखडामुळे सलूनचे भाडे निघणेही अवघड झाल्याची व्यथा सलून चालकांनी मांडली.
..........
आता घर कसे चालवायचे
१) महिनाभर दुकान बंद राहणार असल्याने पगार मिळणार नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. सरकारने विशेष भत्ता देऊन मदत करावी, अन्यथा आमचे खूप हाल होतील.
– बबलू यादव, कारागीर, चांदिवली
२) डिसेंबरमध्येच गावाहून परतलो. आता महिनाभर हाती कमाई येणार नसल्याने चिंतीत आहे. पुन्हा गावी जावे, तर तेथेही रोजगार नसल्यामुळे मुंबईत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
– रामदुलार विश्वकर्मा, कारागीर, पवई
३) महिनाभर हातात मजुरी येणार नसल्याने घरखर्च कसा भागवायचा, याचे टेन्शन आहे. गावाला आईवडील माझ्या भरोशावर जगतात. त्यांनाही पैसे पाठविता येणार नाहीत.
– बिलास साहू, कारागिर, साकीनाका
......................
महिनाभर सलून बंद ठेवल्यास व्यावसायिक नेस्तनाबूत होतील. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. उपमुख्यमंत्री आणि महापौरांनी सलूनबाबत दिलासादायक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
-प्रकाश चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशन