मुंबई : मकरसंक्रांती म्हणजे आनदांची पर्वणीच. पतंगबाजी हा त्यातील एक अविभाज्य घटक. मात्र आनंदाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास जीव गमवावा लागतो, याचे भान राहत नाही. त्यामुळे पतंग उडविताना काही अपघात होणार नाही याची खबरदारी घेऊनच पतंग उडवावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.शहरी भागात असणारी अपुरी जागा, त्यामुळे घराच्या छताहून अनेक वेळा पतंग उडविले जातात. पतंग उडविण्याच्या नादात घराहून गेलेल्या वीजवाहक तारांचाही विसर पडतो. खबरदारी न घेतल्याने अपघात होतो; शिवाय वीजवाहक तारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याची स्पर्धाही लागते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजवाहक तारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीजवाहक तारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. अशावेळी वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शॉक लागून प्राणांकित अपघात होण्याचाही धोका संभवतो. संक्रांतीसारख्या आनंददायी सणाला गालबोट लागू नये, म्हणून पतंग उडविताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पतंग उडविताना घ्या खबरदारी!
By admin | Published: January 12, 2015 2:08 AM