येत्या २ सप्टेंबरला भाजपचा धडक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांच्या विविध समस्यांवर आवाज उठविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व २४ वॉर्डच्या कार्यालयांवर २ सप्टेंबर रोजी मुंबई भाजपतर्फे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जोरदार तयारी मुंबईतील भाजपच्या खासदार आणि आमदारांवर सोपविण्यात आली असून, महापालिका निवडणुकीची तयारी या निमित्ताने भाजप करत आहे.
या मोर्चाबाबत मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ‘त्रस्त मुंबईकरांना न्याय देण्यासाठी’ आणि ‘नुकसानभरपाई आमच्या हक्काची, नाही पालिकेच्या मालकीची’ असा एल्गार करत, मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये विविध नागरी समस्यांविरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात त्रस्त नागरिक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना मदत मिळालीच पाहिजे, कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना पाणीपट्टी, अग्निशमन कर, अंतर्गत रस्ते कर, सुधारणा कर आदींमध्ये किमान ५० टक्के सवलत द्या, निवडणूक प्रचाराच्या वेळी आश्वासित केल्याप्रमाणे ५०० चौ.फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांचा मालमत्ता कर माफ करा, पुरेसे पाणी, खड्डेमुक्त रस्ते द्या, या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.