...तर मारहाण टळू शकली असती
By admin | Published: September 26, 2015 03:18 AM2015-09-26T03:18:22+5:302015-09-26T03:18:22+5:30
केईएममधील बालरोग विभागापासून अवघ्या दहा पावलावर निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. पहाटे मारहाणीचा प्रकार घडला, तेव्हा या हॉस्टेलच्या बाहेर सुरक्षारक्षक असता,
पूजा दामले, मुंबई
केईएममधील बालरोग विभागापासून अवघ्या दहा पावलावर निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. पहाटे मारहाणीचा प्रकार घडला, तेव्हा या हॉस्टेलच्या बाहेर सुरक्षारक्षक असता, तर तीन निवासी डॉक्टरांना झालेली मारहाणीची घटना टळू शकली असती. पण, गेल्या तीन महिन्यांपासून या हॉस्टेललाच सुरक्षा रक्षकच नसल्याने डॉक्टरांची सुरक्षा टांगणीला लागलेली आहे.
निवासी डॉक्टरांचे हे जुने हॉस्टेल आहे. केईएमच्या जुन्या इमारतीत हे हॉस्टेल असून रुग्णालय इमारतीतूनच हॉस्टेलचे प्रवेशद्वार आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक या हॉस्टेलमध्ये येत -जात असतात. या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक द्या, अशी मागणी निवासी डॉक्टर वारंवार करत आले आहेत. मध्यंतरी येथे एका सुरक्षारक्षकाची नेमणूकही करण्यात आली होती. पण, गेल्या तीन महिन्यांपासून येथील सुरक्षारक्षक गायब आहे.
गेल्या महिनाभरात या हॉस्टेलमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केईएमच्या सुरक्षारक्षक कार्यालयात निवासी डॉक्टरांनी कपडे, वस्तू, फ्लशटँक चोरीला गेल्याच्या लेखी तक्रारी नोंदविल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
या हॉस्टेलच्या तळमजल्यावरील स्वच्छतागृहांचा वापर रुग्णांचे नातेवाईक देखील करतात. केईएमचे निवासी डॉक्टर विभागाप्रमाणेच हॉस्टेलमध्ये देखील असुरक्षित असल्याची खंत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.