‘अमेझॉन’च्या वकिलाला मारहाण; मनसेच्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:05 AM2020-12-06T04:05:44+5:302020-12-06T04:05:44+5:30
ऑनलाइन ॲपमध्ये मराठीचा समावेश करण्यावरून वाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘ॲमेझॉन’ या ऑनलाइन ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या ...
ऑनलाइन ॲपमध्ये मराठीचा समावेश करण्यावरून वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘ॲमेझॉन’ या ऑनलाइन ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या वादातून कंपनीचे वकीलपत्र घेणाऱ्या वकिलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की, मारहाण केली होती. या प्रकरणी दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
दुर्गेश गुप्ता असे तक्रारदाराचे नाव असून ते ॲमेझॉनचे वकील आहेत. गुरुवारी दिंडोशी कोर्टात या प्रकरणी होणाऱ्या सुनावणीसाठी ते हजर झाले होते. त्यांनी ॲमेझॉनची बाजू न्यायालयात मांडली. त्यानंतर ते दिंडोशी सत्र न्यायालयातून बाहेर पडले. तेथे मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे आणि त्यांचे कार्यकर्ते हजर होते. चित्रे आणि त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की तसेच मारहाण केल्याचा आरोप करत गुप्ता यांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानुसार चित्रे यांच्यासह चेतन कंठालीय या दाेघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले.