फुटबॉल खेळताना गोल न केल्याने मारहाण! वकोल्यात चौघांवर गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: January 22, 2024 04:34 PM2024-01-22T16:34:14+5:302024-01-22T16:34:33+5:30
याप्रकरणी त्याने वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: फुटबॉल खेळताना गोल न केल्याने एका २९ वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांनी शिव्यागाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याने वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महेंद्रसिंग राठोड (२९) हे सांताक्रूझच्या कलिना परिसरात आई-वडील आणि भावंडांसह राहतात. ते कलिना येथील गुरुद्वाराजवळ असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मैदानात नेहमी फुटबॉल खेळायला जातात. त्यानुसार २१ जानेवारी रोजी देखील ते नेहमीप्रमाणे मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेले. त्यादरम्यान त्यांच्यासोबत खेळत असलेला तरमसिंग लखनपाल याने गोल न झाल्याच्या कारणावरून राठोडना शिवीगाळ करायला सुरुवात केली. राठोड यांनी त्याला याचा जाब विचारल्यावर त्याने त्यांना हाताने मारहाण केली. परिणामी त्याच्या हातातील कड्यामुळे राठोड यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागे जखम होऊन ते रक्तबंबाळ झाले.
काही वेळाने तरमसिंगचे दोन भाऊ इंद्रसिंगलखनपाल त्याचा भाऊ सागरसिंग आणि त्यांचे वडील निर्मलसिंग हे त्याठिकाणी आले. त्यांनी देखील राठोडला आमच्या मुलासोबत भांडण का करतोस असे विचारत हाताने मारायला सुरुवात केली. त्यामुळे राठोड खाली कोसळले तेव्हा या चौघांनी त्यांना लाथेने मारहाण करायला सुरुवात केली. काही वेळाने स्थानिकांनी ही बाब पाहिल्यावर त्यांनी तसेच राठोडचा भाऊ सागरसिंग यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. भावाने राठोडला उपचारासाठी व्ही एन देसाई रुग्णालयात नेले. राठोडच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी चारही पिता-पुत्रांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२३,३२४,३४ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.