मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर हल्ल्याच्या घटना सुरूच असून, आता मालाड आणि वांद्रे भागात पोलिसांना मारहाण झाली. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एक पोलिस जखमी असून, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मालाडच्या घटनेत पोलिस शिपाई अंजिक्श प्रकाश माने (वय ३१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी मिराज हनिफ अन्सारी (२९) याला अटक केली आहे. माने हे रात्रपाळी कर्तव्यावर हजर राहून गस्त करीत असताना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चारजणांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. त्यांनी चारही जणांना तेथून जाण्यास सांगितले. याचा राग मनात धरून अन्सारीने रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटचा तुकडा मानेच्या दिशेने मारला. यामध्ये त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे.
सरकारी कामात आणला अडथळा
दुसऱ्या घटनेत बीकेसी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. मनोज उत्तम देसले (४०) यामध्ये जखमी झाले आहे. बुधवारी ते बीकेसी उत्तर वाहिनीवर कर्तव्य बजावत असताना, आरोपी रेहमान अहमद नजीर याला नो पार्किंगमधून त्याची कार हटविण्यास सांगितली. याच रागात त्याने पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यालाही अटक करण्यात आली असून, बीकेसी पोलिस अधिक तपास करीत आहे.