नायरमधील निवासी डॉक्टरांना मारहाण; नातेवाइकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 01:41 AM2020-01-12T01:41:24+5:302020-01-12T01:41:45+5:30
आश्वासनानंतर काम करण्याचा निर्णय
मुंबई : डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा आणखी एक प्रकार शनिवारी मुंबईच्या नायर रुग्णालयात घडला. शनिवारी सकाळी नायर रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला चढवून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याच्याच निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप पुकारत ओपीडी सेवेत काम न करण्याचा निर्णय घेतला, पण मार्डच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीमध्ये मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आधिष्ठातांनी दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयात महिन्याभरापूर्वी एका १३ वर्षांच्या मुलाला दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्याची प्रकृती खूपच बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर, काही तासांतच त्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत डॉ. प्रज्वल चंद्रा आणि डॉ. कार्तिक असुतकर यांना दुखापत झाली आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असून, डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सोबतच वॉर्डमधील सुरक्षा वाढवावी, रुग्णालयातील भेटीच्या वेळ निश्चिती करावी, मनुष्यबळाच्या संख्येत वाढ करावी आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी समुपदेशन सुरू करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांनी दिली. रुग्णाच्या वडिलांच्या विरोधात डॉक्टरांना मारहाण केल्याचा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर आधिष्ठातांसोबत झालेल्या बैठकीत रुग्णालय प्रशासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून माजी सैनिकांच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांना सुरक्ष पुरवण्यात येईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आल्याचे मार्डचे डॉ. सतिश नायर यांनी दिली.
पुन्हा एकदा नायर रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला करत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या वर्षाचे निवासी डॉक्टरांना दुखापत झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. - डॉ. कल्याणी डोंगरे, अध्यक्षा, निवासी डॉक्टर संघटना (मार्ड).