मुंबई - ओला चालकाला क्रूरपणे मारहाण करत उचलून आपटणाऱ्या ऑडी चालक ऋषभ चक्रवर्तीविरुद्ध दाखल गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवत त्याला अटक करण्यात आली. रविवारी न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ऋषभ चक्रवर्तीच्या हल्ल्यात ओला चालक कयमुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (२४) जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी सुरुवातील दाखल गुन्ह्यात कमी शिक्षेचे कलम लावले म्हणून कुटुंबीयांकडून आरोप करण्यात येत होते. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. अखेर, याप्रकरणात तपासाअंती पोलिसांनी डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल आणि व्हिडीओच्या केलेल्या तपासणीच्या आधारे कुरेशीला जीवघेणी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, चक्रवर्तीविरुद्ध दाखल गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे. या कलमानुसार, त्याला अटक करत रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तसेच त्याच्या पत्नीचा नेमका सहभाग समोर येताच तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पार्क साईट पोलिसांनी सांगितले.