मनीषा म्हात्रेमुंबई : अभ्यास करत नाहीत म्हणून चौथीच्या तीन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ येथे घडली आहे. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाणीची ही घटना कैद झाली असून संबंधित शिक्षिकेविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांताक्रूझ पश्चिमेकडील जुहू तारा रोड येथील खासगी प्राथमिक शाळेत ही घटना घडली. या शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतुजा वेटकर (५१) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. वेटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शुभांगी उबाळे (५०) यांच्याविरोधात ६ डिसेंबरला विद्यार्थ्याच्या पालकांकडून तक्रारी येण्यास सुरुवात झाली.
चौथीतील विद्यार्थ्याच्या पालकाने उबाळे शिक्षिकेने मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याबाबत तक्रार दिली. वेटकर यांनी उबाळे यांच्याकडे विचारणा केली असता मुले अभ्यास करत नाहीत म्हणून मारल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ आणखीन दोन पालकांच्या तशाच तक्रारी आल्यानंतर वरिष्ठांनी सीसीटीव्ही तपासले असता शिक्षिकेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिसून आले. उबाळे यांनी विद्यार्थ्यांना केलेली मारहाण बघून वरिष्ठांनाही धक्का बसला. ही बाब शाळेच्या विश्वस्तांपर्यंत पोहोचताच त्यांनी घटनेला गांभीर्याने घेत बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीत काय दिसले...६ डिसेंबरला दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास शिक्षिका या तीन विद्यार्थ्यांना खुर्ची बसून जवळ बोलावून त्या मुलांच्या तोंडावर, पाठीवर हाताचे बुक्क्यांनी व त्यांना खाली पाडून लाथेने मारून त्यांचा हात पिरगळताना दिसते आहे. मुले किंचाळत, विव्हळत असतानादेखील शिक्षिकेची मारहाण सुरूच आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल...याप्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवत अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी सांगितले.
अन्य विद्यार्थ्यांकडेही चौकशीशाळेतील अन्य विद्यार्थ्यांनाही शिक्षिकेकडून मारहाण झाली आहे का? याबाबत शाळा प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.