मेट्रो-६ च्या मार्गात सुशोभीकरण आणि वृक्षारोपण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:32 PM2023-11-27T13:32:28+5:302023-11-27T13:33:38+5:30
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अशी पश्चिम आणि मध्य मुंबईतील उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबई : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अशी पश्चिम आणि मध्य मुंबईतील उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होणार असून ही मेट्रो मार्गिका एलिव्हेटेड धावणार आहे. या मेट्रो मार्गिकेच्या खालील भागात एमएमआरडीएने रंगकाम,तसेच सुशोभीकरण केले आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबई शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यानंतर एमएमआरडीएकडूनही मेट्रो मार्गिकेखालील जागेचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. एमएमआरडीएने स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गिकेच्या काही भागात रंगरंगोटीचे काम केले आहे, तसेच या ठिकाणी वृक्षारोपणदेखील करण्यात आले आहे.
राखाडी रंग, पिवळ्या, काळ्या पट्ट्या:
एमएमआरडीएने मुंबई मेट्रो मार्ग ६ च्या आराखड्यातील व्हायाडक्टच्या खालील भागात राखाडी, तसेच पिवळ्या, काळ्या पट्ट्यांचे रंगकाम केले आहे आणि काही ठिकाणी झाडेदेखील लावली आहेत. ही झाडे वाढल्यानंतर हा मार्ग बहरणार असून, रात्रीच्या वेळेस वाहनांच्या प्रकाशाची तीव्रता कमी होणार आहे.
सुशोभीकरण पूर्ण:
सुशोभीकरणांमध्ये स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, लोखंडवाला, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली लेणी, सिप्झ, साकी विहार जंक्शन, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई कांजूरमार्ग जंक्शन आणि विक्रोळी यांचा समावेश.
इतर मेट्रो मार्गिकेचेही सुशोभीकरण :
एमएमआरडीएकडून शहर उपनगरात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. केवळ मेट्रो ६ च नाही, तर इतर मार्गिकांचेदेखील सुशोभीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मुंबईकरांना अधिक रस्ता :
सुशोभीकरण, रंगकाम आणि वृक्षारोपणासाठी या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते. काम पूर्ण झाल्याने बॅरिकेड काढण्यात आले.
बॅरिकेड काढलेल्या ४.८ किमीपैकी २.२ किमी भागातील सुशोभीकरण पूर्ण झाले असून, बॅरिकेड हटवल्याने मुंबईकरांना वाहतुकीस अधिक रस्ता मिळाला आहे, तसेच वाहतूककोंडीची ही समस्या मार्गी लागली आहे.