Join us

नेरूळमधील उद्यानाचे होणार सुशोभीकरण

By admin | Published: January 19, 2015 12:29 AM

नेरूळमधील सारसोळे डेपोजवळ असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उद्यानामध्ये नवीन खेळणी बसविण्यात येणार

नवी मुंबई : नेरूळमधील सारसोळे डेपोजवळ असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उद्यानामध्ये नवीन खेळणी बसविण्यात येणार असून जॉगिंग ट्रॅकसह संरक्षण भिंतीचेही काम केले जाणार आहे. नेरूळ पश्चिमेला असलेल्या महत्त्वाच्या उद्यानामध्ये सारसोळे डेपोजवळील पंडित रामा भगत उद्यानाचा समावेश आहे. महापालिकेने २०१० मध्ये उद्यानाचे सुशोभीकरण केले होते. परंतु उद्यानामध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे पाच वर्षात उद्यानाची दुरवस्था झाली होती. संरक्षण भिंत कोसळली होती. जॉगिंग ट्रॅक खराब झाला आहे. खेळण्यांचीही स्थिती वाईट झाली असून मुलांना दुखापत होण्याची शक्यता बळावली होती. उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होवू लागली होती. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक नगरसेवक सूरज पाटील यांनी पाठपुरावा करून सुशोभीकरणाचे काम मंजूर करून घेतले. नुकतेच महापौर सागर नाईक यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सदर उद्यानामध्ये चांगली खेळणी बसविण्यात येणार आहेत. तुटलेली संरक्षण भिंत पुन्हा बांधण्यात येणार आहे. सकाळी या ठिकाणी जॉगिंगसाठी नागरिक मोठ्याप्रमाणात येत असतात. यामुळे जॉगिंग ट्रॅकही तयार केले जाणार आहे. यामुळे नागरिकांची विशेषत: मुलांची होणारी गैरसोय दूर होईल. (प्रतिनिधी)